Pune : वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या बीएमडब्ल्यू कारचालकाला अटक

एमपीसी न्यूज- बीएमडब्ल्यू कारचालकाला थांबविल्याच्या कारणावरून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि.3) सकाळी 10 च्या दरम्यान मुंढवा वाय जंक्शन येथे घडली.

चिराग राजेंद्र सातव (वय 27, रा. वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी राजू नारायण निकम (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 10 च्या दरम्यान फिर्यादी निकम हे मुंढवा वाय जंक्शन येथे वाहतूक नियंत्रणाचे काम करीत होते. त्यावेळी तिथे चिराग सातव बीएमडब्ल्यू कारमध्ये आला आणि त्याने मुंढवा गावाकडे जाण्यासाठी आपली कार धोकादायकरित्या वाहतूककोंडी निर्माण होईल अशा पध्दतीने वळवली.

त्यामुळे निकम यांनी त्याला इशारा करून गाडी थांबविण्यास सांगितले. दरम्यान चिराग आणि त्याचा एक साथीदार गाडीतून खाली उतरले. त्यांनी निकम यांना ‘गाडी का थांबवली ?’ असे विचारत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. निकम यांनी आरोपींच्या गैरवर्तनाचा व्हिडीओ बनवून मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देऊन त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.