Pune News : गूळ व साखरेचा 9 हजार 628 किलोचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची हवेली तालुक्यात कारवाई

एमपीसी न्यूज – हवेली तालुक्यात कोलवडी येथील बोरमलनाथ गूळ उद्योगातील गु-हाळावर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत भेसळीच्या संशयावरून 98 हजार 240 रुपये किंमतीचा 3 हजार 70 किलो गुळ आणि 2 लाख 29 हजार 530 रुपये किंमतीची 6 हजार 558 किलो साखर असा 9 हजार 628 किलो साठा जप्त करण्यात आला आहे.

पुणे विभागाचे सहआयुक्त शि. स. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी अ. ध. झांजुर्णे यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या गुऱ्हाळावर छापा टाकला. यापुढे देखील अन्न व औषध प्रशासनातर्फे अशा स्वरुपाची कारवाई सुरू ठेवली जाणार असून नागरिकांनी अन्न भेसळीबाबत 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन परिमंडळ तीनचे सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांनी केले आहे.

गुटखा विक्रेत्याकडून 10 लाखाचा साठा जप्त

परिमंडळ पाचचे सहाय्यक आयुक्त (अन्न) सं. भा. नारागुडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती बारवकर, रा. भि. कुलकर्णी यांच्या पथकाने आज (गुरुवारी, दि. 9) पहाटे 5 वाजता गुटखा विक्रेता राजु मलबारे यांच्या घरासमोरील वाहनामधून 10 लाख 44 हजार 400 रुपयांचा पानमसाला, सुगंधीत तंबाखू आणि सुगंधीत सुपारी साठा जप्त केला. कारवाईत 7 लाख रुपये किंमतीचे वाहन देखील जप्त करण्यात आले असून यवत पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधितांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी गुटखा, पानमसाला विक्रीबाबत 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन नारागुडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.