Pune : मिसेस क्वीन ऑफ द वर्ल्ड इंटरनॅशनल २०१८ ‘ बहुमान पुण्याच्या जास्मिन जाधवला

एमपीसी न्यूज – पुण्याच्या सौ. जस्मिन जाधव हिने म्यान्मारमध्ये नुकत्याच झालेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘मिसेस क्वीन ऑफ द वर्ल्ड इंटरनॅशनल २०१८ ‘ बहुमान जिंकून इतिहास घडवला. वयोगट २३ ते ३५ दरम्यानच्या महिलांच्या स्टँडर्ड कॅटॅगरीतून विजेतेपदाचा मुकूट पटकावत जस्मिनने भारताची मान जागतिक व्यासपीठावर अभिमानाने उंचावली आहे.   
जस्मिन जाधव (वय ३१) ही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पुण्यात झालेल्या मिसेस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत उपविजेती ठरली होती. तेव्हापासून जागतिक सौंदर्य सम्राज्ञीपदाच्या मुकूटापर्यंतचा तिचा प्रवास अगदी अल्पकाळात आणि वेगाने पार पडला आहे. जस्मिनच्या मार्गदर्शक अंजना मस्कारेन्हस यांनी ही जागतिक सौंदर्य स्पर्धा होण्यापूर्वी केवळ दोन आठवडे आधी तिला स्पर्धेत भाग घेण्याविषयी सुचवले आणि त्यातून जस्मिनला प्रेरणा मिळाली.
” खरं सांगायचं तर माझ्याकडे पासपोर्टही तयार नव्हता. तरीही मी गेल्या १९ जूनला पारपत्र कार्यालयात गेले आणि मला दोन दिवसांत पासपोर्ट मिळाला. त्यानंतर मी व्हिसासाठी अर्ज केला. तोही दोन दिवसांत मिळाला आणि २३ जूनला मी म्यानमारला रवानाही झाले. मी जिंकण्याचा अथवा हरण्याचा विचारही केला नव्हता. या स्पर्धेत आपल्यातील गुणांचा १०० टक्के आविष्कार घडवायचा आणि एक समृद्ध अनुभव घेऊन परत यायचे, इतकेच मी ठरवले होते. तो आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन घेऊनच मी स्पर्धेत उतरले, ” अशी हर्षभरित प्रतिक्रिया जस्मिनने व्यक्त केली.
जागतिक सौंदर्य स्पर्धेत जस्मिनला विविध फेऱ्यांमधून पुढे जावे लागले. त्यातील बंद दारामागील मुलाखत ही फेरी विशेष लक्षात राहणारी होती. यामध्ये सात परीक्षकांनी तिच्यावर विविध प्रश्नांची फैर झाडली. ही फेरी अवघड होती, कारण त्यामागील उद्देश जस्मिनची केवळ बुद्धिमत्ता तपासण्याचा नसून तिची समयसूचकता व दडपणाला बळी न पडण्याची मानसिक ताकद जोखण्याचा होता. या फेरीतूनच जस्मिनच्या विजयाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

अंतिम फेरीत जस्मिनला विचारण्यात आले, की तिची मुले नैराश्यग्रस्त झाली तर ती काय करेल ? यावर जस्मिनने शांतपणे सकारात्मक उत्तर दिले, की पालक या नात्याने ती मुलांवर ओढावलेल्या संकटप्रसंगात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीच्या लढ्यात सकारात्मक बनवण्यास मदत करेल. या उत्तराने परीक्षकांचे मन जिंकले आणि जस्मिनला जागतिक सम्राज्ञीपदाचा प्रतिष्ठेचा मुकूट सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला.
जस्मिन ही पेशाने इंटेरियर डिझायनर आहे. ती व्हिविड इंटेरियर्स या फर्ममध्ये भागीदार आहे. जस्मिनच्या मते तुम्ही एखादी गोष्ट साध्य करण्याचा दृढ निश्चय केलात, की कुठलेही आव्हान तुम्हाला रोखू शकत नाही. निश्का व नीरजा या जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर जस्मिनचे वजन इतके वाढले होते, की तिने स्वतःला तंदुरुस्त आणि सुडौल बनवण्याचा निश्चय केला. ” काटेकोर मेहनत करुन मी माझे वजन १०० किलोंवरुन ५३ किलोंवर आणले. सौंदर्य स्पर्धेसाठी मी ‘ दिवा पेजियंट स्टुडिओ ‘ मध्ये मार्गदर्शन घेतले आणि त्यातून मला मिसेस महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्याची प्रेरणा मिळाली, ” असे जस्मिनने नमूद केले. आज जस्मिन ‘ एबीएस जिम ‘ चा चेहरा म्हणूनही ओळखली जाते.
आंतरराष्ट्रीय कामगिरीसंदर्भात जस्मिन आपल्या यशाचे श्रेय पेशाने थ्रीडी व्हिज्युअलायझर असलेले पती भूपेंद्र जाधव, सहा वर्षांच्या   निश्का व नीरजा जाधव या दोन जुळ्या मुली, सासरचे लोक आणि मार्गदर्शक अंजना मस्कारेन्हास यांना देते. ” या सर्वांच्या सहभागाशिवाय हा प्रवास शक्यच झाला नसता. मी सौंदर्य स्पर्धेचे राष्ट्रीय संचालक अमर शामू सोनवणे व जीत दास यांचीही ऋणी आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘ मिसेस क्वीन ऑफ द वर्ल्ड पेजियंट ‘ स्पर्धेची पुढची आवृत्ती आपल्या पुण्यात आयोजित करण्याची संधी या दोघा संचालकांनी प्रयत्नपूर्वक खेचून आणली आहे, ” असेही जस्मिनने आवर्जून नमूद केले.
जस्मिन ही ‘ मिसेस क्वीन ऑफ द वर्ल्ड ‘ सौंदर्य स्पर्धेची ब्रँड ॲ म्बॅसेडर बनली असून निरनिराळ्या देशांना भेटी देत आहे. या दौऱ्यातून ती महिला व मातांच्या सक्षमीकरणाचा ताकदवान संदेश प्रसृत करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.