Wakad : शहरातील भटक्या कुत्रे व डुक्करांचा बंदोबस्त करा 

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांची मागणी.

एमपीसी   न्यूज   – पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांना विशेषतः महिलांना भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. वृत्तपत्रांत दिवसा आड कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या बातम्या येत आहेत. शहरात सर्वच भागांत भटक्या कुत्र्यांचा व डुक्करांचा उपद्रव वाढला असून, त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहरातील  नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न वाढत असल्याने या भटक्या प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,शहरातील कुत्र्यांची संख्या वाढत असून भटक्या कुत्र्यांनी महिला, शालेय विद्यार्थींना  चावा घेतल्याच्या घटना शहरात नेहमीच घडत आहेत. महापालिकेकडून श्वानपथक उदासीन झाल्याने मोकाट प्राण्याच्या उपद्रव वाढला आहे. यासाठी  लवकरात-लवकर भटक्‍या प्राण्यांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाय-योजना राबविण्यात येणे गरजेचे आहे.  शहरातील विविध भागातील  तक्रारी येऊन देखिल महापालिकाकडून ठोस उपाययोजना राबवल्या जात नसल्याचे चित्र आहे. शहरातील भटकी कुत्री पकडण्यासाठीची यंत्रणा अपुरी पडत असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.
भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या पाहता त्यांचे निर्बीजीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.एकीकडे कुत्र्यांचा त्रास आणि दुसरीकडे डुकरांचाही त्रास यामुळे  शहरवासीय त्रस्त झालेत. डुकरांकडूनही नागरिकांवर हल्ले होत आहेत. सध्या स्वाइन फ्लूने शहरात डोके वर काढलेय. स्वाइन फ्लू हा सामान्यतः डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. शहरात डुकरांनी उच्छाद मांडल्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न वाढू लागलाय. तरी श्वानपथकाबरोबर डुकरे पकडण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र  यंत्रणा राबविण्यात यावी. वेळीच उपाययोजना न केल्यास  महापालिकेच्या गलथान कारभारा विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वाकडकर यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.