Chakan : लेझर बॅटरी चमकवून मुलींसोबत अश्लील हावभाव केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – मुलींचा पाठलाग आणि त्यांच्यासोबत केली जाणारी अश्लील कृत्ये काही केल्या थांबत नाहीत. असाच एक प्रकार चाकण येथे समोर आला आहे. रात्रीच्या वेळी मुली त्यांच्या रूममध्ये आल्यावर दुस-या इमारतीवरून लेझर बॅटरी चमकवून त्यांचे लक्ष वेधून घेऊन त्यांना विचित्र पद्धतीने खुणावून अश्लील हावभाव केल्याचा एक प्रकार उघडकीस आला.  या प्रकरणी तीन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नरेंद्र संभाजी वाळुंज (वय 23, रा. स्वप्ननगरी एन बिल्डिंग, चौथा मजला, चाकण), विठ्ठल भाऊसाहेब बुरुंगळे (वय 23, रा. स्वप्ननगरी, एक बिल्डिंग, पाचवा मजला, चाकण) आणि हृषीकेश डफळ या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मूळची अहमदनगरची आहे. नोकरीनिमित्त पुण्यात आली असून चाकण येथे स्वप्ननगरी इमारतीत तिच्या चार मैत्रिणींसोबत राहते. मागील एक महिन्यापासून तिन्ही आरोपी दररोज रात्री फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रणी घरी आल्यानंतर त्यांच्या रूममध्ये लेझर बॅटरी चमकावत असत. यामुळे तरुणींचे त्यांच्या नित्याच्या कामातून लक्ष विचलित होत असे. तसेच मुलींचे लक्ष विचलीत झाल्यावर त्यांना अश्लील हावभाव करीत असे. या कृत्यामुळे त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. तसेच त्यांना असुरक्षित वाटल्याने मुलींनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.