Pimpri News : अनधिकृत होर्डिंग, न्यायालयाचा ‘जैसे थे’चा आदेश आणि पाच जणांचा बळी

एमपीसी न्यूज – किवळे येथील कामगारांच्या (Pimpri News) जीवावर बेतलेले होर्डिंग हे अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. या अनधिकृत होर्डिंगनेच पाच निष्पापांचा बळी घेतला. शहराच्या विविध भागात तब्बल 434 अनधिकृत होर्डिंग असल्याचे समोर आले आहे. या अनधिकृत फलकांचा न्यायालयात वाद सुरु असून न्यायालयाचे जैसे थे चे आदेश आहेत. त्यामुळे महापालिकेला या होर्डिंगवर कोणतीही कारवाई करता आली नाही. पण, होर्डिंग उभे होईपर्यंत महापालिका प्रशासन काय करत होते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

किवळे येथे अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. महापालिकेची परवानगी न घेता शहरातील रस्ते, उद्याने, पदपथ, क्रीडांगणे, स्मशानभूमी, नाले अशा अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग उभारले आहेत. या होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. शहरात 434 अनधिकृत होर्डिंग असून हे होर्डिंग काढून टाकण्याची कार्यवाही करण्यात येणार होती. मात्र, पिंपरी-चिंचवड जाहिरात असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने या होर्डिंगला “जैसे थे” ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे अनधिकृत होर्डिंगवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.

शहरात महापालिकेच्या जागेत 35, बांधकाम व्यावसायिकांचे 28 आणि खासगी जागेत 1 हजार 344 असे 1 हजार 407 अधिकृत होर्डिंग आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंगची संख्या असताना केवळ 434 अनधिकृत होर्डिंग असल्याचा महापालिकेचा दावा आहे. या होर्डिंगवर न्यायालयाच्या आदेशामुळे कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. दुसरीकडे पालिकेने 1 एप्रिल 2022 ते 13 एप्रिल 2023 या एक वर्षांपेक्षा जास्त कालावधीत (Pimpri News) फक्त 127 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली आहे. यामध्येही पालिकेने 31 होर्डिंगवर कारवाई केली. तर, 91 जणांनी स्वतः होर्डिंग काढून घेतले आहे. या कारवाईतून दंडापोटी पालिकेला 6 लाख 68 हजार 802 रूपये मिळाले आहेत.

Vadgaon Maval : मोरया महिला प्रतिष्ठान आयोजित मेकअप सेमिनार उपक्रमास उदंड प्रतिसाद

किवळेतील होर्डिंगचे मालक महेंद्र तानाजी गाडे आहेत. तर, जागा मालक नामदेव बारकू म्हसुडगे आहेत. हे होर्डिंग अनधिकृत असून त्यास परवानगी देण्यात आलेली नाही. अनधिकृत होर्डिंग संदर्भात महापालिकेने कारवाईस सुरवात केल्यावर पिंपरी-चिंचवड जाहिरात असोसिएशन यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश प्राप्त झाल्याने या होर्डिंगवर कारवाई करता आलेली नाही. याबाबत नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, न्यायालयाच्या आदेशामुळे अनधिकृत होर्डिंगवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. या दुर्घटनेची न्यायालयात सर्व माहिती दिली जाईल. अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी योग्य ती बाजू वकिलांमार्फत मांडण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.