Rajnath Singh Criticised State Govt: महाराष्ट्रातील सरकार म्हणजे तीन पक्षांची सर्कस – राजनाथ सिंह

Rajnath Singh Criticized State Govt: Government of Maharashtra is a circus of three parties - Rajnath Singh महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती पाहता तिथे सरकार नावाची गोष्टच नाही, असे वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.

एमपीसी न्यूज – भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व विद्यमान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील कोरोना संकटाच्या परिस्थितीवरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रातील सरकार हे तीन पक्षांचे आहे, पण ते पाहून असे वाटतेय की सरकारच्या नावावर सर्कस सुरु आहे. विकासाचे व्हिजन महाराष्ट्र सरकारकडे नाही, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली.

राजनाथ सिंह यांनी काल (सोमवारी) महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी ‘व्हर्च्युअल रॅली”च्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनासारख्या जागतिक महामारीचे संकट किती मोठे आहे, हे किमान महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. या संकटात महाराष्ट्राच्या जनताही धीटपणे सामोरे जात आहे, असे राजनाथ सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, “महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती पाहता तिथे सरकार नावाची गोष्टच नाही, असे वाटत आहे. सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. महाराष्ट्रातील सरकार हे तीन पक्षांचे आहे. पण ते पाहून असे वाटत आहे की, सरकारच्या नावावर सर्कस सुरु आहे. विकासाचं व्हिजन महाराष्ट्र सरकारकडे नाही.”

“कोरोनामुळे ज्या प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली आहे, तो गंभीर विषय आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी शक्य तेवढी मदत मोदी सरकार करत आहे. कोरोना या महामारीचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. हे आव्हान भारताने दृढ निश्चयासह स्वीकारलं आहे. भारत सरकारच्या प्रयत्नांमुळेच कोरोना संकटात जगातील अनेक विकसित देशांच्या तुलनेत भारताची स्थिती फारच चांगली आहे,” असे राजनाथ सिंह म्हणाले.

शिवसेनेविषयी बोलतना राजनाथ सिंह म्हणाले की, “निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भाजपची युती झाली होती. पण सत्तेच्या हव्यासापोटी युती झाल्यानंतर भाजपला धोका देण्यात आला. मी भाजपची विचारधारा स्पष्ट करु इच्छितो, आम्हाला धोका मिळू शकतो पण धोका कधीच देऊ शकत नाही.”

मोदी सरकारच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा सुधारल्याची बाब संपूर्ण जग मान्य करत आहे. 2013 मध्ये भारताची जी आर्थिक स्थिती होती, त्याच्या तुलनेत 2019 मध्ये भारताची स्थिती फारच सुधारली आहे. 2014 मध्ये मोदी पंतप्रधान बनले त्यावेळी मोदी सरकार पाच वर्षांमध्ये लोकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करतील की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. परंतु पाच वर्षांचा काळ गेला तेव्हा संपूर्ण देशाने मोदी सरकारच्या कामावर पसंतीची मोहोर उमटवली आणि 2019 मध्ये आधीपेक्षा जास्त बहुमत दिले. 2014 ची निवडणूक असो किंवा 2019 ची लोकसभा निवडणूक, किंवा महाराष्ट्राची निवडणूक सगळीकडे भाजपला पूर्ण समर्थन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.