Ravet: … अखेर रावेत येथील प्रस्तावित स्मशानभूमी रद्द; नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकने रावेत येथील सेक्टर नंबर 32 येथील जागा स्मशानभूमीसाठी आरक्षीत करून तेथे स्मशानभूमी प्रस्तावित केली होती. मात्र, गेल्या एक वर्षापासून स्थानिक नागरिक तसेच स्थानिक नगरसेवक यांनी सातत्याने आंदोलन आणि मोर्चे काढून या स्माशासनभूमीला विरोध केला. परिणामी, आज (सोमवारी) महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी संबंधित नागरिकांशी चर्चा करून प्रस्तावित स्मशानभूमी रद्द करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांनी दिली.

महापालिकेने एक वर्षापूर्वी रावेत येथील सेक्टर नंबर 32 येथील जागेत स्मशानभूमीचे आरक्षण टाकले होते. त्यानुसार स्मशानभूमीच्या बांधकामास सुरूवातही करण्यात आली. मात्र, या स्मशानभूमीला स्थानिक नागरिकांनी विरोध केला. येथील नागरिकांनी प्राधिकरणात रहायचे म्हणून जादा पैसे देऊन घरे खरेदी केली आहे. प्राधिकरणात सुखसोयींसाठी हे नागरिक जादा पैसे मोजतात. ज्या वेळेस स्मशानभूमीचे आरक्षन पडले. त्या वेळेस स्थानिक नागरिकांना याबाबत सांगण्यात आले नव्हते. तसेच ही स्मशानभूमी झाल्यास वाऱ्याच्या दिशेनुसार स्मशानभुमीतून निघणारा धूर थेट या नागरिकांच्या घराकडे येणार आहे.

त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी कारणे देत स्थानिकांनी या स्मशानभुमीला विरोध केला. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांच्याकडे धाव घेतली. खानोलकर यांनी या संदर्भात महापालिका प्रशासनाची वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र, स्मशानभूमी रद्द झाली नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक नागरिकांबरोबर महापालिकेवर आंदोलन तसेच मोर्चे काढले. शेवटी महापालिका आयुक्त यांनी सोमवारी बैठक घेत स्मशानभूमी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

नगरसेविका स्थायी समिती सदस्या प्रज्ञा खानोलकर म्हणाल्या, ”रावेत येथील सेक्टर नंबर 32 येथे स्मशानभूमीला स्थानिकांचा विरोध होता. स्थानिक नागरिकांच्या हक्कासाठी त्यांच्यासोबत याबाबत लढा दिला. या लढ्याला यश आले असून स्मशानभूमी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी स्मशानभूमीचे झालेले काम योगा सेंटर, जॉगिंग ट्रॅक यामध्ये रुपांतरित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.