Pimpri : रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक; रायरेश्वर सहकार पॅनल प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराची जोरदार सुरुवात

एमपीसी न्यूज – रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 12 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. कामगार नेते इरफान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणा-या रायरेश्वर सहकार पॅनलने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. कपबशीच्या चिन्हावर रायरेश्वर सहकार पॅनल निवडणूक लढवीत आहेत. गेल्या तीन वर्षात रायरेश्वर माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी कामगार हिताचे काम केले आहे. त्यामुळे यावेळी देखील पॅनलचा विजय निश्चित असल्याचा विश्वास सय्यद यांनी यावेळी व्यक्त केला. 

निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर गणेश मंदिरात प्रचारसभा झाली. पॅनल प्रमुख ज्ञानोबा मुजूमले, उमेदवार भिवाजी वाटेकर, खंडू गवळी, विजय खंडागळे, ज्ञानेश्वर घनवट, सतीश कंठाळे, ज्ञानेश्वर औतडे, रोहित नवले, सुभाष पुजारी, पाराजी व्यवहारे, प्रकाश चोरे, पुष्पा काळे, ललिता सावंत हे उमेदवार रायरेश्वर सहकार पॅनलकडून निवडणूक लढवीत आहेत. यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे पांडूरंग कदम, परेश मोरे, सर्जेराव कचरे, प्रविण जाधव, मुरलीधर कदम, गोरक्ष बांगर, शंकर मदने, अंकुश सोनसळे, नेट्को कंपनीचे शिंदे, मारुती वाळुंज, गोरक्ष दुबाले, अशोक साळुंखे, श्रीकांत मोरे, सुनील सावळे, राजू तापकीर आदी उपस्थित होते.

पतसंस्था स्थापना वेळी सदस्य विरुद्ध विघ्नसंतोषी असमाधानी सदस्य अशी ही निवडणूक होणार असल्याने यावेळी या निवडणुकीकडे सर्व स्तरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सर्वसाधारण, महिला राखीव प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती, मागासवर्गीय या पाच प्रवर्गातील 13 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. कष्टकरी माथाडी कामगारांमध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इरफान सय्यद म्हणाले, माथाडी कामगारांना पूर्वीपासूनच कमी दर्जाची तसेच पत नसल्याप्रमाणे वागणूक दिली आहे. म्हणूनच कष्टकरी कामगारांनी मिळून त्यांच्या हक्काची एक पतसंस्था सुरु केली. आज पतसंस्थेत कोट्यावधी रुपयांचे भाग भांडवल आहे. या माध्यमातून कामगारांनी आपली पत वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरातच स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. याच नावाने आपण पॅनलची स्थापना केली आहे. कपबशी हे आपल्या पॅनेलचे चिन्ह आहे. सर्वांनी कपबशी चिन्हासमोर शिक्का मारून रायरेश्वर सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

मागील तीन वर्षात पतसंस्थेच्या संचालक मंडळाने सभासदांना साडेचार लाख रुपयांपर्यंत दीर्घ मुदतीचे कर्ज, 20 हजार रुपयांपर्यंत तातडीचे कर्ज देण्याची भूमिका घेतली. सभासदांना एक टक्के व्याजदर कमी केला. सभासदांना लाभांश वाटप, पतसंस्थेचे प्रशस्त कार्यालय सुरु करण्यात आले आहे. पतसंस्थेतील काही संचालकांच्या अहितकारी धोरणामुळे बिनविरोध निवडणूक होण्याची परंपरा यावेळच्या निवडणुकीत मोडीत निघणार आहे. त्यामुळे अडथळे निर्माण करणा-या लोकांना या निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकविण्याची संधी आली आहे. सभासदांच्या वाढत्या मागण्यांचा विचार करून कमी व्याज आणि योग्य वेळी लाभांश तसेच कर्ज देण्याची सुरळीत व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही सय्यद म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.