नाटक : ‘चि सौ कां रंगभूमी’ प्रसन्न आनंददायी सोहळा

122

(दीनानाथ घारपुरे)

HB_POST_INPOST_R_A

एमपीसी न्यूज- रंगभूमी, रसिकांची आवडती, आपलासा वाटणारा रंगमंच, त्यावर रसिकांसाठी सादर केलेलं रसिकांना अर्पण केलेली कलाकृती, जिवंत नाट्यमयता आणि उर्जा देणारी कला, म्हणजे “ नाटक “ ह्या नाटकाच्या इतिहासात अनेक बदल झाले. प्रयोगाचे विविध रूपाने सादरीकरण केले गेले, संगीत आणि गद्य नाटके या रंगभूमीवर आली, त्यातील काही सुवर्ण कृतीने नटलेली पाने नाट्यसंपदा कलामंच या लोकप्रिय नाट्य संस्थेने चि सौ कां रंगभूमी या नाटकातून उलगडून दाखवलेली आहेत. 

याचे निर्माते यशवंत देवस्थळी आणि अनंत पणशीकर हे आहेत, लेखन – दिग्दर्शन संपदा जोगळेकर कुलकर्णी यांचे असून संगीताची भक्कम बाजू वर्षा भावे यांनी सांभाळलेली आहे. नेपथ्य सचिन गावकर, प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे. यामध्ये केतकी चैतन्य, शर्वरी कुलकर्णी, नचिकेत लेले, शमिका भिडे, अवधूत गांधी, अमोल कुलकर्णी, राहुल मेहेंदळे, अनिरुद्ध देवधर, संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी विविध भूमिका साकारलेल्या आहेत.

चि सौ कां रंगभूमी हिचे लग्न रसिकराज याच्याशी लागते आणि त्यांचा रंगभूमीवरील संसाराला सुरवात होते, रंगभूमी विविध रंगांची चैतन्य देणारी सात पावले चालून माप ओलांडून घरात येते आणि संगीत आणि गद्य रूपाने नाट्यमय प्रसंगाला सुरवात होते, नांदी ते भैरवी चा सुरमय तसेच विविध प्रसंगाने आणि भिन्न-भिन्न रसानी युक्त असलेला प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. हे सारे रंगतदारपणे, अभ्यासपूर्ण रीतीने सर्वच कलाकारांनी सादर केला आहे. रंगभूमीचा इतिहास उलगडत जाताना रसिक त्यामध्ये रंगून जातो. संगीत नाटकात स्वयंवर, मानापमान, कुलवधू, शारदा, संशयकल्लोळ, जय जय गौरीशंकर, अश्या गाजलेल्या नाटकातील लोकप्रिय पदांचा खुबीने वापर करून ती विलक्षण उर्जेने सादर केली आहेत. ह्या नाट्य गीतांना संगीत साथ ऑर्गनवर केदार भागवत आणि तबल्यावर सुहास चितळे यांची उत्तम लाभली आहे. त्याच प्रमाणे एकच प्याला, तो मी नव्हेच, फुलराणी, नटसम्राट, हमीदाबाईची कोठी, अश्या नाटकामधील प्रवेशांचे रंगतदारपणे सादरीकरण केल आहे. एक प्रसन्न आनंददायी सोहळाच आपणासमोर साकारला आहे.

चि सौ कां रंगभूमी आणि रसिकराज यांच्या संसाराची मांडणी, त्यामधील असणारे रुसवे-फुगवे, सांभाळत जीवनातील गमतीजमतीची कोडी सोडवत सर्वकाही सुरेलपणे खुलवले आहे. संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी रंगभूमी / फुलराणीची भूमिका तसेच राहुल मेहेंदळे यांनी रसिकराज, लखोबा लोखंडे, नटसम्राटची भूमिका योग्य ते बेअरिंग सांभाळून केली आहे. ह्या शिवाय नचिकेत लेलेचा बालगंधर्व, केतकी चैतन्यची कृतिका / सईदा , शमिका भिडेची मैना, शर्वरी कुलकर्णीची नवी रंगभूमी, अमोल कुलकर्णीचा तळीराम, अवधूत गांधीचा नारद, यांच्याही भूमिका त्यांनी मनापासून केल्या आहेत. तसेच सुयोग्य अश्या वेशभूषेची जबाबदारी नीता पणशीकर यांनी सांभाळलेली आहे. सचिन गावकर यांनी उभारलेल नेपथ्य हे सुद्धा एक भूमिकाच करीत आहे असे जाणवते, त्याला अनुसरून शीतल तळपदे यांनी प्रकाश योजना साकारलेली आहे ती सुद्धा परिणाम साधून जाते.

हा रंगभूमीचा प्रवास उलगडत असतांना काही सोनेरी पानांचे दर्शन संगीत आणि गद्य च्या रूपाने विलक्षण उर्जेने सादर केला आहे असे म्हणायला हवे. एक सुरेल संगीतमय नाटक पाहिल्याचे समाधान मिळेल.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: