Vadgaon Maval News : ‘या’ कारणामुळे वडगावात एकच खळबळ; नेमकं काय घडलं?

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील मुख्य ठिकाण असलेल्या वडगाव शहरात सध्या मुख्य रस्त्याचे काम करण्यात येत आहे. हे काम प्रगतीपथावर असून त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आले आहे. दरम्यान, पुढील टप्प्यातील काम करण्यास स्थानिक नागरिकांकडून विरोध दर्शवण्यात येत असून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांना यासंबंधी नोटीस दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील रस्त्याचे काम हे शहरातील मुख्य बाजारपेठेतून होणार आहे. सदर रस्ता देखील 12 मीटर रुंदीचाच व्हावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे, परंतु बाजारपेठेतील नागरिक मात्र या 12 मीटर रुंदीकरणाला विरोध दर्शवत आहेत. दरम्यान स्थानिकांच्या विरोधानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने 12 मीटर पर्यंतचे अतिक्रमण हटविण्याच्या नोटीस दिल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहराला आमदार सुनील शेळके यांनी रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी एकूण 7 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पहिल्या टप्प्यात खंडोबा मंदिरापर्यंत रस्त्यासाठी 4 कोटी व उर्वरित बाजारपेठेतील काँक्रिटीकरणासाठी 3 कोटी निधी असेल.

दरम्यान रस्त्याची रुंदी 10 मीटर व दोन्ही बाजूने प्रत्येकी 1 मीटर बंदिस्त लाईन करून त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार आहे. याप्रमाणे रस्ता 12 मीटर रुंदीचा होणार आहे. बाजारपेठेतील रस्ता 12 मीटर रुंदीचा करायचा झाल्यास मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे काढावी लागणार आहे.

त्यामुळे बाजारपेठेतील रस्त्याची रुंदी कमी करण्यात यावी, अशी मागणी प्रामुख्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी केली, तर दुसरीकडे हा रस्ता शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने हा देखील 12 मीटर रुंदीचाच व्हावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रामुख्याने पहिल्या टप्प्यातील रस्ता 12 मीटरचा झालेला असून बाजारपेठेतील रस्ता देखील त्याच अंतराचा झाला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. इतर नागरिक आणि बाजारपेठेतील स्थानिक यांच्या वेगवेगळ्या भूमिकेवर सार्वजनिक बांधकाम खाते कोणती भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.