Sangavi: निविदा रद्द, तरीही खेळणी बसविली, महापालिकेचे चार लाखाचे नुकसान – जावेद शेख

अनधिकृत खेळणी जप्त करा, दंडात्मक कारवाई करा

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ताब्यातील सांगवी येथील पवनाथडी जत्रेच्या जागेत पीडब्लूडी मैदानावरील लावलेली अनधिकृत खेळणी जप्त करुन संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी केले आहे. तसेच खेळणी लावण्यासाठी राबविलेली निविदा प्रक्रिया रद्द झाली असतानाही मैदानावर खेळणी लावली आहेत. त्यातून महापालिकेचे चार लाखाचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. सांगवीतील पी. डब्लू. डी. मैदानावर महापालिकेच्या वतीने आजपासून   ‘पवनाथडी’ जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पवना थडीच्या मैदानावरील संभाव्य गर्दी पाहाता लहान मुलांसाठी खेळणी लावण्याकरीता ई-निविदा जाहिर केली होती. मात्र; काही तांत्रिक कारणास्तव निविदा 20 फेबु्रुवारी 2020 रोजी रद्द करण्यात आली. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग (पी. डब्लू. डी.) मैदानावर जत्रेनिमित्त एजन्सीने लहान मुलांची खेळण्याकरीता सामुग्री लावली असल्याचे निदर्शनात आले आहे.

निविदा मंजूर अथवा महापालिकेची लिखीत मंजुरी नसताना खेळणी लावण्याचे एखादी एजन्सी धाडस करते. याचाच अर्थ येथे महापालिकेतील अधिकार्‍यांचे अर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याची दाट शंका येते. अथवा  एजन्सीवर कुणाचा तरी वरद हस्त असावा असे वाटते.  या अनधिकृत खेळण्यामुळे महापालिकेच्या निविदा रकमेप्रमाणे 4 लाख रुपयांचे अर्थिक नुकसान होत आहे.  या एजन्सीवर त्वरीत दंडात्मक कारवाई करुन खेळणी जप्त करावीत, अशी मागणी नगरसेवक शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.