Lifetime Achivement Award: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मधुवंती दांडेकर यांना संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

Sangeet Rangbhumi Jeevan Gaurav Award to Senior Classical Singer Madhuvanti Dandekar मधुवंती दांडेकर यांनी संगीत रंगभूमीच्या उत्तर काळात अनेक संगीत नाटकातून समर्थपणे विविध भूमिका रंगवल्या. त्यात जुन्या व नव्या संगीत नाटकांच्या समावेश होता.

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ शास्त्रीय गायिका, अभिनेत्री मधुवंती दांडेकर यांची राज्य सरकारच्या संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. मधुवंती दांडेकर यांनी संगीत रंगभूमीवर दीर्घकाळ काम केले आहे. बालगंधर्व हे त्यांचे आदर्श होते. पाच लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मधुवंती दांडेकर यांनी संगीत रंगभूमीच्या उत्तर काळात अनेक संगीत नाटकातून समर्थपणे विविध भूमिका रंगवल्या. त्यात जुन्या व नव्या संगीत नाटकांच्या समावेश होता.

‘मानापमान’,’एकच प्याला’, ‘झाला महार पंढरीनाथ’, ‘कृष्णार्जुनयुद्ध’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’ आणि ‘सौभद्र’ यांसारख्या प्रसिद्ध संगीत नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.

त्यानंतर नाटककार विद्याधर गोखले यांच्या रंगशारदा संस्थेच्या ‘मंदारमाला’, ‘सुवर्णतुला’, ‘मदनाची मंजिरी’ आणि ‘ध्रुवतारा’ या अभिजात संगीत नाटकांमध्ये काम करुन रंगभूमीवर स्वत:चा वेगळा ठसा उमटवला.

‘तारिणी नव वसन धारिणी’, ‘ये मौसम है रंगीन’, ‘ऋतुराज आज वनी आला’ या सारख्या गाण्यांवर मधुवंतीबाईंची अजरामर छाप आहे. मराठीशिवाय हिंदी तसेच गुजराती रंगभूमीवर त्यांनी काम केले आहे.

या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मधुवंतीबाई म्हणाल्या की, ‘संगीत रंगभूमीचे आद्य नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नावाचा पुरस्कार हा त्यांचा आशीर्वाद आहे. माझे गुरु, कुटुंबीय आणि रसिकांचा यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.