Sangvi:  शहरात मटका, गुटखा जोरात, औद्योगिकनगरी झालीय ‘क्राइम सिटी’ –  अजित पवार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात खून, मारामाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वर्षभरात 70 खून, 93 जणांवर  जीवघेणे हल्ले झाले आहेत.  या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहराच्या औद्योगिक, कामगारनगरी या लौकिकला तडा गेला आहे. शहरात मटका, गुटख्याच्या धंदे जोरात सुरू आहेत. औद्योगिकनगरीची ओळख ‘क्राइम सिटी’ झाली आहे अशी टीका करत याला जबाबदार कोण? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.  शहरातील गुन्हेगारी वाढत असताना मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार काय करत आहेत, असेही ते म्हणाले. 
केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यात ‘निर्धार परिवर्तन’ यात्रा काढण्यात येत आहे.  ही यात्रा आज शनिवारी (दि. 2)पिंपरी-चिंचवड शहरात आली असून सांगवीतील पीडब्ल्युडी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील,  विधान परिषदेचे  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,  शहराध्यक्ष संजोग वाघेरे,  माजी आमदार विलास लांडे,  अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके,  कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, वर्षा जगताप आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
शहरातील गुन्हेगारी वाढली असून मटका, गुटखा जोरात सुरू आहे. गाड्या फोडल्या, जाळल्या जात आहेत. दहशत माजवली जात आहे. पोलीस यंत्रणा काय करत आहे, पोलिसांचा कसलाही वचक राहिला नाही. गुन्हेगारांना भाजप नेत्यांचे संरक्षण मिळत आहे. बगलबच्याच्या चुकांवर पांघरूण घातले जात आहे. चुकीच्या कामांसाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप करत अजित पवार म्हणाले, “भाजपच्या राज्यकर्त्यांना शहराचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही.  यांचे ऐकणारे कोण नाही. त्यामुळे शहरवासीयांवर अन्याय होत आहे. अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रिंगरोडचा प्रश्न प्रलंबित आहे.
आमच्या काळात बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळालेल्या शहराची कचरा सिटी झाली आहे. दवाखाने बांधून तयार आहेत. पण, कोणाला चालवायला द्यायचे, याच्यावरून अडले आहे. निर्णय घेण्याची क्षमता नाही. आमदारांना शहर विकासाचे काही देणेघेणे राहिले नाही. तोडपाणी चालले आहे. रस्त्याच्या अलीकडचे तू बघ आणि पलीकडचे मी बघतो, असे वाटून घेऊन खात आहेत. यांना विचारणारे कोण नाही. महापालिका आयुक्तांना काही कळेनाच झाले आहे. त्यांना इथे काम नको आहे” असेही अजित पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.