Chinchwad : अन्यायकारक अटकेतून अ‍ॅड.संजीव पुनाळेकर यांची त्वरित मुक्तता करा; हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

एमपीसी न्यूज – डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येच्या तपासाची दिशाहीनता न्यायालयापुढे मांडून अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी तपास यंत्रणांचा नाकर्तेपणा जनतेपुढे उघड केला. त्यामुळे सूडबुद्धीने अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रम भावे यांना अटक करण्यात आली आहे. हिंदुत्वनिष्ठांची ही गळचेपी हिंदू समाज कदापी सहन करणार नाही. या अन्यायकारक अटकेतून अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची तात्काळ मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी  (दि.२० जून) चिंचवड येथील  छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात एकवटलेल्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी ‘अ‍ॅड. पुनाळेकर यांना मुक्त करा’ म्हणत अ‍ॅड. पुनाळेकर यांच्या अन्याय्य अटकेविषयी असंतोष व्यक्त केला.

आंदोलकांनी ‘संविधानाचा सन्मान करा, पुनाळेकर यांना मुक्त करा’, ‘जनमताचा आदर करा, पुनाळेकर यांना मुक्त करा’, या घोषणांचे फलक दाखवून सीबीआय ने केलेल्या अन्यायकारक अटकेचा तीव्र निषेध केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले, सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.