Pune: पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी सुरु

Savitribai Phule Pune University begins preparations for final year exams मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात अंतिम वर्षाचीही परीक्षा होणार नाही असं सांगितलं होतं.

एमपीसी न्यूज- अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, परीक्षासंदर्भात कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका राज्यपालांनी घेतली. त्यातच आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी सुरु केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस उमराणी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, 8 मे रोजीच्या राज्य शासनाच्या आदेशामध्ये अंतिम वर्ष वगळता बाकी वर्षांची परीक्षा होणार नाही असं नमूद केलं होतं.

यानंतर अजून कोणताही नवीन आदेश शासनाकडून आलेला नाही. त्यामुळे 8 मे रोजीचं सर्क्यूलर हेच विद्यापीठासाठी बंधनकारक आहे. या सर्क्यूलरमध्ये नमूद केल्याप्रमाणे अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठाकडून सुरु आहे.

फक्त अंतिम वर्षाची परीक्षा होणार असा शासनाने आदेश काढल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात अंतिम वर्षाचीही परीक्षा होणार नाही असं सांगितलं होतं.

यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला. यानंतर अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याच्या संदर्भात कोणताही अधिकृत जीआर शासनाकडून काढण्यात आलेला नाही, असं विद्यापीठाचं म्हणणं आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अंतिम वर्षासाठी जवळपास 2 लाख 46 हजार विद्यार्थी प्रविष्ट आहेत. ही परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला विविध कोर्सेसच्या एकूण दोन हजार प्रश्नपत्रिका सेट कराव्या लागणार आहेत.

विद्यापीठाकडून पारंपरिक पद्धतीची लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये दीड तासांची 50 किंवा 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.