Pimpri News : माझ्या शहराने केलेला सन्मान मला अधिक प्रिय – सावनी रवींद्र

एमपीसी न्यूज – भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्काराबरोबर देशभरातील अनेक ठिकाणी गौरव झाला पण माझ्या शहराने केलेला सत्कार मला कुटुंबाने केल्यासारखा वाटत असून तो मला सर्वाधिक प्रिय असल्याची भावना विख्यात पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांनी आज येथे व्यक्त केली.

पिंपरी – चिंचवड कल्चरल फाऊंडेशनच्या वतीने पहिला कलाविभूषण पुरस्कार चिंचवड येथील स्थानिक सावनी रवींद्र यांना रविवारी मोठ्या दिमाखदार सोहळ्यात काल प्रदान करण्यात आला. 51 हजार रुपये, भव्य स्मृतिचिन्ह, आणि औक्षण व साडी चोळी देऊन ओटी भरण्याचा हृद्य सोहळा सांगवी येथील निळु फुले नाट्यगृहात पार पडला.

दरम्यान, पद्‌मश्री गिरीश प्रभुणे, खासदार श्रीरंग बारणे, माजी महापौर उषा ढोरे, फौंडेशनचे अध्यक्ष विजय भिसे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, शत्रुघ्न काटे, नाना काटे, शेकापचे प्रकाश बालवडकर, शारदा हिरेन सोनवणे, सखाराम नखाते आदी मान्यवरांच्या हस्ते सावनी रविंद्रला कलाविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

“या पुरस्कारामुळे मला अधिक उर्जा व बळ प्राप्त झाले असून शहराचे नाव, प्रतिमा व प्रतिष्ठा वाढविण्यासाठी यापुढील काळात अधिक प्रयत्न करणार असल्याचे सावनी रवींद्र यांनी म्हटले. मागील वर्षी ‘बारडो’ या चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

पद्‌मश्री प्रभुणे यांनी, ‘सावनीच्या यशात तिच्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा असून पिंपरी चिंचवड शहराचे भाग्य उजळले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, खासदार बारणे, भोईर यांचीही यावेळी भाषणे झाली. आपल्या प्रास्ताविकात फौंडशनचे अध्यक्ष विजय भिसे यांनी, दरवर्षी 1 मे रोजी कला, साहित्य, संगीत क्षेत्रातील मान्यवरास कलाविभूषण पुरस्कार देणार असल्याची माहिती दिली.

यावेळी सावनी रवींद्र यांच्या सुमधूर गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष घुले यांनी तर शशिकांत काटे यांनी आभार मानले. शिल्पा बिडकर, सतिश इंगळे, डॉ. अमरसिंह निकम, श्रीकांत चौघुले आदींचे या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.