Chinchwad Crime News : पिंपरी परिसरात अवैध धंदे अंमली पदार्थांची विक्री वाढल्याची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

एमपीसी न्यूज – पिंपरी परिसर आणि पिंपरीतील झोपडपट्टी परिसरात अवैध धंदे वाढले आहेत. गांजा सारख्या अंमली पदार्थांची विक्री देखील वाढली आहे. त्यामुळे बालगुन्हेगारी वाढत असल्याची तक्रार माजी नगरसेवक हीरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

डब्बू आसवानी यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पिंपरी आणि पिंपरीतील झोपडपट्टी परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये अवैधरित्या गांजा विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीमधील मुले व्यसनाधिन होत आहेत. परिणामी परिसरातील गुन्हेगारी वाढत आहे. याचा त्रास पिंपरी परिसरातील रहिवासी तसेच शहरातील इतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. याचा पिंपरी परिसरातील व्यापारी वर्गावर देखील मोठा परिणाम होत आहे.

शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये रोडरोमिओंचा त्रास वाढला आहे. शाळेच्या समोर दिवसभर काही रोडरोमिओ वाहने लावून व्यसन करून मुलींची छेड काढत असतात. पोलिसांचे पेट्रोलिंग होत नाही. मध्यंतरी पिंपरी परिसरात तीन चारचाकी वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार झाला. या प्रकरणात संबंधित व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलीस अधिकाऱ्यांनी तुम्ही 112 या नंबर वरती फोन करा असे उत्तर दिले. नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर असे उत्तर मिळत असेल तर नागरिकांनी त्यांच्या तक्रारी कोणाकडे घेऊन जायचे असा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही डब्बू आसवानी यांनी निवेदनात म्हटले आहे.

पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवावे. तसेच एका सक्षम अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली एक पथक निर्माण करून या संपूर्ण प्रकारावर अंकुश आणावा अशी मागणी देखील डब्बू आसवानी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.