School Reopen : दीड वर्षांनंतर घंटा वाजली! पुष्पवृष्टी करून मुलांचे जोरदार स्वागत

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाचे सावट अजूनही कायम आहे. मात्र या संकटात काळजी आणि कोरोना नियमांच्या पालनाची गुणसुत्री वापरत राज्सरकारने शाळा चालू करण्यास परवानगी दिली आहे. शासन नियमानुसार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालय, आकुर्डी येथे कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन‌ करत आज (दि.04 ऑक्टो) इ. ८ वी ते १२ वी चे वर्ग  अतिशय उत्साहाने सुरू झाले. 

शाळा सुरू झाल्याच्या निमित्ताने श्री म्हाळसाकांत माध्यमिक विद्यालयाच्या सांस्कृतिक व क्रीडा विभागाच्या वतीने आकर्षक रांगोळी काढून परिसर सुशोभित करण्यात आला होता. तब्बल दीड वर्षांनंतर शाळेची घंटा वाजली त्यामुळे विद्यालयात उत्साहाचे वातावरण होते. मुलांच्या स्वागतासाठी उपप्राचार्य गायकर के.डी , उपमुख्याध्यापक रोकडे एस आर , पर्यवेक्षक पुंडे सखाराम सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , माजी विद्यार्थी , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक जमले होते.

दरम्यान, महिला शिक्षकांनी मुलींचे औक्षण केले व सर्व शिक्षकांनी मुलांवर पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले. आज  पालकांची सुद्धा मोठी उपस्थिती होती.  शाळेचा पहिला दिवस असूनही ९५% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शाळेचा पहिला दिवस असूनही विद्यार्थांनी वेळ न घालवता पर्यावरण संवर्धनाच्या कार्यक्रमावर भर देत वृक्षारोपण केले. कोरोनाकाळात ऑक्सिजन तुटवड्यामुळे झालेलत्या वाताहतीवर उपाय म्हणून वृक्षरोपणाचा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी नियमानुसार पालकांची उपस्थितीबाबत संमतीपत्रके आणली होती. दरम्यान, शाळेत मुलांची तपासणी करण्यात आली आणि १५ महिन्याच्या प्रतिक्षेनंतर सर्व नियमांचे पालन करत कामकाज सुरू झाले. मुलांना आपल्या शाळेत येण्याचा, आवडत्या शिक्षकांना भेटण्याचा आनंद मात्र गगनात मावत नव्हता.

आजच्या या उत्साहपुर्ण वातावरणात शाळेतील वातावरण भयमुक्त व तणावमुक्त होऊन मुलांना ‘चला शाळेत जाऊ या व आनंदाने शिकू’ हा संदेश देण्यात आला. साधारण दीड वर्षांच्या कालावधीनंतर वर्गात शिकण्याचा व शिकवण्याचा आनंद आज विद्यार्थी व शिक्षकांच्या चेह- यावर दिसत होता.

याप्रसंगी बोलताना प्राचार्य सुनिल लाडके  म्हणाले, “विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये .म्हणून विद्यालय प्रत्येक मुलांपर्यंत पोहचणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.