Shapith Gandharva : शापित गंधर्व – भाग 26 – देवपुत्र अजिंक्य

एमपीसी न्यूज : मराठी चित्रपटसृष्टीतल्या नामवंत आणि आदर्श असा नावलौकिक असलेल्या दांपत्याच्या पोटी त्याचा जन्म झाला होता. त्याला परमेश्वराने जबरदस्त आणि पहिल्याच भेटीत प्रभाव पडेल असे व्यक्तिमत्त्वही दिले होते. त्याला अभिनयाची उत्तम जाण होती. (Shapith Gandharva) एका दमदार नायकाकडे जे हवे असायला हवे, ते सर्व त्याच्याकडे होते. मराठी चित्रपटसृष्टीत त्याने धडाक्यात आगमन केले; आपल्या नावाचा ठसाही उमटवला. पण ती वा तशीच कामगिरी करण्यात हिंदी चित्रपटसृष्टीच्या रजत पडद्यावर मात्र त्याला यश काही मिळाले नाही. कायम दुय्यम वा नकारात्मक भूमिका त्याही विशेष दखलपात्र नसलेल्याच त्याला मिळत गेल्या. मला  तरी असे वाटते अजूनही त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत त्याच्या दर्जानुसार एकही भूमिका मिळालेलीच नाही.’अजिंक्य रमेश देव उर्फ अजिंक्य देव’ हा आजच्या लेखाचा नायक आहे.

प्रख्यात सिनेदांपत्य रमेश देव आणि सीमा देव यांच्या पोटी  3 मे 1963 रोजी जन्माला आलेले हे थोरले अपत्य. सीमा देव आणि रमेश देव या विख्यात जोडीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी खूप वर्षे गाजवली आहे. त्यामुळे अभिनयाची जाण त्यांच्या पोटी आलेल्या अपत्याला नसेल तर आणखी कोणाला येणार? अजिंक्य देवसाठी अभिनयाची दोन चालती बोलती विद्यापीठं घरातच होती. पण गंमतीचा भाग असा की लहानपणी अजिंक्यला अभिनयाची आवड नव्हती आणि त्याला चित्रपटसृष्टीतही यायचे नव्हते. त्याने संगणक शास्त्रातील पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला. तिथली पदवी यशस्वीरित्या मिळवून तो भारतात परतला.

पण देवाच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. 1985 साली आलेल्या ‘अर्धांगी’ या मराठी चित्रपटात त्याला मुख्य नायकाची भूमिका मिळाली. पुढे रमेश देव यांनी दोन वर्षांनंतर ‘सर्जा’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली, ज्यात अजिंक्यने अप्रतिम काम केले. हा चित्रपट चांगलाच यशस्वी झाला आणि एवढंच नाही तर अजिंक्यला या चित्रपटातल्या भूमिकेसाठी चक्क राष्ट्रीय पारितोषिक मिळाले.

यानंतर त्याने ‘संसार’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले. रेखा, राज बब्बर अनुपम खेर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात अजिंक्यने तोडीस तोड अभिनय करून आपल्या आगमनाची वर्दी तमाम हिंदी चित्रपटसृष्टीला दिली. (Shapith Gandharva) त्याची जबरदस्त अभिनय क्षमता, त्याचे प्रभावी आणि देखणे व्यक्तिमत्त्व, सहा फूट उंची- एका नायकाला हवे असणारे सर्व काही त्याच्याकडे असल्याने एक नवा उमदा आणि रजत पडद्यावर अधिराज्य करेल असा नायक सापडला असे सर्वांना वाटत होते.

Jitendra Awhad : महेश आहेर हल्ला प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल

मात्र का कोण जाणे, अजिंक्यला हिंदी सिनेमात चांगले रोल नाहीच मिळाले. कधी खलनायक, कधी भ्रष्टाचारी पोलीस असे दुय्यम रोल त्याला मिळत गेले. इथे टिकायचे असेल तर काम मिळणे गरजेचे. त्यामुळे मिळेल ते काम तो करत गेला आणि दुर्दैवाने इथेच त्याचा घात झाला. एकदा त्याच्यावर खलनायकाचा, बी ग्रेड कलाकाराचा शिक्का बसला तो बसलाच.

आपल्याला इथे हवे तसे रोल मिळत नाहीत, हे त्याला उमगल्यानंतर त्याने पुन्हा आपला मोर्चा मराठी पडद्याकडे वळवला. त्याच दरम्यान आलेला ‘माहेरची साडी’ या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले; पण याचे बरेचसे श्रेय अलका कुबलला गेले. यात तिच्या सावत्र भावाची भूमिका अजिंक्यने अतिशय दमदार केली होती.

या चित्रपटातल्या त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले आणि त्याचा त्याला करियरसाठी फायदाही झाला. यानंतर त्याने आणखी काही मराठी चित्रपट केले, ज्यात ‘वाजवा रे वाजवा’ हाही एक यशस्वी चित्रपट होता. त्यानंतरही त्याने बऱ्याच मराठी, काही प्रादेशिक आणि हिंदी चित्रपटातही काम केले. (Shapith Gandharva) केवळ त्याचा अभिनय दर्जेदार असल्याने त्या भूमिका लक्षात राहिल्या; अन्यथा त्या भूमिकेत खास असे काहीच नव्हते. पण जो रोल मिळालाय, त्याला सार्थ आणि पूर्ण न्याय द्यावा ही शिकवण असल्याने त्याने प्रत्येक भूमिकेत आपले 100% योगदान दिले.

नशीब हा भागच असा आहे की तुमच्याकडे सर्व काही असूनही तुम्हाला यश मिळत नाही. विचित्र आहे पण हेच सत्य आहे. तो  वरचा डॉन तुम्हाला इतरांकडे जे नाही ते देतो; पण सर्व काही देऊन काही गोष्टी आपल्या हातात ठेवतो आणि सांगतो, जोपर्यंत मला वाटत नाही, तोपर्यंत असेच राहील. खूप आवडता खेळ आहे हा त्याचा. मात्र तो  असे का करतो, हे कोणालाही कळत नाही. ना याचे कोणाकडे उत्तर असते ना यावरचा उपाय. म्हणूनच साक्षात ‘देवा’च्या पोटी येऊनही, नायकासाठी लागणारे सर्व काही असूनही अजिंक्य देवला आजतागायतही हिंदी चित्रपटसृष्टीत योग्य नावलौकिक देईल असा रोल मिळाला नाही.

मराठी चित्रपटसृष्टीवर त्याने बऱ्यापैकी राज्य केले; पण त्या यशाच्या 25 % सुद्धा यश त्याला हिंदी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत मिळालेले नाही हेच सत्य आहे. (Shapith Gandharva) कलाकाराला वय नसते असे नेहमीच म्हटले जाते. म्हणूनच 56 वर्षांच्या बोम्मन इराणीने कुठल्याही वारशाविना अल्पावधीतच आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. हे त्याला मिळालेले वरदानच. शापाला उ:शाप असतो. तसाच उ:शाप अजिंक्यला आता तरी मिळावा आणि त्याच्यातली प्रतिभा जगापुढे यावे आणि त्याला यश मिळावे, इतकीच प्रार्थना त्या सर्वसाक्षी परमेश्वराकडे!

 

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.