Shapith Gandharva Part 3 : शापित गंधर्व (पुष्प 3)-चिंपू उर्फ राजीव राज कपूर

एमपीसी न्यूज : त्याचा जन्म भारतीय चित्रपटसृष्टीतल्या द ग्रेट शोमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज कपूरच्या घरात शेंडेफळ म्हणून झाला होता. पृथ्वीराज कपूर आजोबा, शम्मी, शशी काका, तर रणधीर कपूर, ऋषी कपूर हे सख्खे भाऊ असा प्रचंड मोठा आणि जगाला हेवा वाटावा असा समृद्ध वारसाही त्याला लाभला होता. (Shapith Gandharva Part 3) काहीसे पिंगट डोळे,कुरळे केस ,काश्मीरी लोकांसारखी सफरचंदी गव्हाळ कांती ,चांगली अभिनय क्षमता सर्व काही त्याला जन्मजात लाभलेही होते. परमेश्वराने त्याला सर्व म्हणजे सर्व काही दिले होते. दिले नव्हते फक्त यश आणि त्यासाठी लागणारे नशीब.

होय! आजचा तिसरा शापित गंधर्व म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो आहोत, तो शापित गंधर्व म्हणजेच चिंपू उर्फ राजीव राज कपूर. केवळ ‘राम तेरी गंगा मैली’ हा एकमेव प्रचंड यशस्वी चित्रपट त्याच्या नावावर होता. अर्थात त्याचेही श्रेय त्याला कधीच मिळाले नाही.(Shapith Gandharva Part 3) मिळाले ते राज कपूरच्या दिग्दर्शन कौशल्याला आणि मंदाकिनीच्या अंगप्रदर्शनाला. अर्थात यश सांघिक असते, हे जरी मान्य केले, तरी पुन्हा तसे कधीही सांघिक यश त्याच्या वाट्याला आले नाही. नाही म्हणजे नाहीच.परमेश्वराचाअतर्क्य खेळ या जगात कधीही कुणाला उमगला नाही ,तो नेहमीच कुठल्याही मर्त्य माणसाच्या, तथाकथित अभ्यासू माणसाच्या आकलनाच्या पुढे असतो म्हणतात ते जराही खोटे नाही, बरोबर ना?

25 ऑगस्ट 1962 साली त्याचा जन्म कृष्णा राज कपूर यांच्या पोटी झाला. सोन्याचा चमचा घेऊनच तो जन्माला आला होता. त्यात शेंडेफळ. साहजिकच त्याचे बालपण कोडकौतुकातच झाले. त्याला ते सर्व काही मिळाले,जे द राज कपूरच्या पोटी आलेल्या मुलाला मिळायला पाहिजे होते. मिळाले नाही ते फक्त यशस्वी फिल्मी करियर आणि नावलौकिक. त्यातच दुर्दैवाने त्याचे वैयक्तिक आयुष्यही अपयशीच ठरले. वास्तूविशारद आरती सबरवालसोबत त्याने लग्नाची गाठ बांधली खरी; पण त्यातही त्याला यश मिळाले नाही. दोन वर्षातच त्यांनी काडीमोड घेतला आणि तिथेही त्याच्या वाट्याला निराशाच आली.

Today’s Horoscope 8 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

असे नाही की राज कपूरने त्याच्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. तो फक्त 21 वर्षाचा असताना त्याला ‘एक जान है हम’ हा चित्रपट मिळाला होता आणि तो अगदीच मामुली चालला असेही नव्हते. तो बऱ्यापैकी यशस्वी ठरलाही होता. दिव्या राणा म्हणून एक हिरोईन होती(होतीच) आणि त्यानंतर केवळ दोनच वर्षांच्या कालावधीनंतर आला तो सुपरडुपर हिट झालेला ‘राम तेरी गंगा मैली’ हा त्याच्या आयुष्यातला एकमेव मैलाचा दगड असलेला यशस्वी चित्रपट. हा चित्रपट राज कपूरचाही दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट होता, जो प्रचंड यशस्वी ठरला होता.(Shapith Gandharva Part 3) काश्मीरच्या स्वर्गीय लोकेशनवरील शूटिंग, रवींद्र जैन यांचे आजही कानाला मंत्रमुग्ध करणारे संगीत, लताबाईंच्या आवाजातली एकापेक्षा एक सुंदर गीते आणि सोबतच राज कपूरच्या त्याच चिरपरिचित अंदाजातले नायिकेचे कुठेही अश्लील न वाटणारे तरीही अंगप्रदर्शन म्हणूनच ओळखले जाणारे पण सौंदर्यदर्शन या नावाखाली मोडणारी कलाकृती, या सर्वांची भट्टी जुळून आल्याने हा चित्रपट अफाट यश मिळवून गेला. मात्र याचा फायदा राजीव कपूरला काही झाला नाही. झाला तर तो फक्त मंदाकिनीलाच. दैवदुर्विलास म्हणतात तो हाच असेल का हो?

यानंतर ना त्याला तसे यश मिळाले ना तसे चित्रपटही. चित्रपट मिळाले तेही लव्हरबॉय, जबरदस्त, आसमान, हम तो चले परदेश असे कुणाच्याही फारसे लक्षात राहणार नाहीत असे. आपल्या नशिबात यश नाही हे कदाचित त्याला उमगल्याने त्याने आपले नशीब आजमावण्यासाठी चित्रपट दिग्दर्शनाचा मार्ग धरला. माधुरी दीक्षित आणि भाऊ ऋषी कपूरला घेऊन त्याने प्रेमग्रंथ नावाचा एक चित्रपट काढलाही. पण हाय रे दुर्दैवा! इथेही त्याच्या वाट्याला अपयशच आले. असे म्हटले जाते की आपल्या वडिलांनी आपल्या करियरला दिशा मिळावी म्हणून जे करायला हवे ते राज कपूरने केले नाही, असा त्याचा जबरदस्त समज/ग्रह झाला होता. त्यामुळे त्याने राज कपूर सोबत संबंध तोडले होते. ते इतके की त्यांचे निधन झाल्यानंतरही राजीव कपूर अंत्यसंस्कारासाठी गेला नाही. यात किती खरे किती खोटे ते तेच जाणोत. पण अशी चर्चा/अफवा त्याकाळी खूप जोरात होती. प्रेमग्रंथच्या अपयशानंतर त्याचे नाव हळूहळू फिल्मी दुनियेतून बाजूला पडत गेले आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या या कचकड्याच्या दुनियेने राजीव कपूरला अगदी सोयीस्कररित्या विस्मरणात टाकले.

त्याने ‘शादी का सिझन’ या टीव्ही मालिकेचीही निर्मिती केली, पण त्यातही… 2001 साली त्याने आपली मैत्रीण वास्तूविशारद आरती सबरवाल सोबत सप्तपदीची गाठ बांधत आजन्म सोबत चालण्याचा विचार करत दोनाचे चार केले. पण दोनच वर्षांत त्यांचे नाते संपुष्टात आले.(Shapith Gandharva Part 3) कदाचित यामुळेच तो जास्त निराश झाला असावा. अखेरच्या काही काळात तो आपला ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर सोबतच राहत होता. त्याचे नाव पद्मिनी कोल्हापुरे,दिव्या राणा,तृष्णा सिंग यांच्यासोबतही जोडले गेले; मात्र ते सर्व प्रकरण फक्त चर्चेपुरतेच राहिले.

 

अखेर 9 फेब्रुवारी 2021 रोजी म्हणजे वयाच्या 58 व्या वर्षी या गंधर्वाची शापातून सुटका झाली आणि राहत्या घरीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले.(Shapith Gandharva Part 3) त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलेही; पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर तमाम मिडियाने ‘द ग्रेट शोमन राज कपूरचे धाकटे चिरंजीव राजीव कपूर यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन’ अशी एक ओळीची बातमी देऊन आपले कर्तव्य पार पाडताना तो खरोखरच शापित गंधर्व होता हेच जणू अधोरेखित केले. सर्व काही जवळ असूनही केवळ नशिबाने साथ न दिल्याने या शापित गंधर्वाने वयाच्या 58  व्या वर्षी इहलोकीचा त्याग करत स्वर्गीय प्रवासाची वाट धरली. अशा या देखण्या, चतुरस्त्र पण शापित अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली!

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.