Shirur Crime News : ‘माझे डोळे परत द्या…मी त्या नराधमांना ओळखेन ‘ शिरुरमधील त्या पीडितेची आर्त विनवणी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी 'ससून'मध्ये घेतली पीडितीची भेट

एमपीसीन्यूज : ‘ त्यादिवशी नेमके काय घडले ते मी सर्व सांगेन… आरोपींना मी ओळखते… त्या नराधमांनी माझ्यावर काय-काय अत्याचार केले, हे पण सांगेन… पण मला माझे दोन्ही डोळे परत द्या…’ अशी आर्त विनवणी शिरुर घटनेतील पीडित महिलने आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली.

शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील एका महिलेवर क्रूर हल्ला करुन तिचे डोळे काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात जाऊन त्या पीडित महिलेची भेट घेतली.

याप्रकरणातील नराधमांना तात्काळ अटक करण्याची आग्रही मागणी प्रविण दरेकर यांनी यावेळी पोलिस अधीक्षकांकडे केली.

ससून रुग्णालयातील भेटीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, न्हावरे मधील घटना अतिशय गंभीर व भयंकर आहे. पुण्यात गेल्या काही महिन्यांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे पुणे प्रशासनाने अशा घटनांची तातडीने दखल घेण्याची गरज आहे.

हाथरसच्या घटनेचा बोलबाला देशभर करणारे आता कुठे झोपले आहेत. हाथरस सारख्या घटना रोज मुंबई व महाराष्ट्रात घडत आहेत, परंतु हाथरसच्या घटनेचे राजकारण झाले.

पण आता या शिरुरच्या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न एरणीवर आला आहे व हा प्रश्न सरकारने सोडविला पाहिजे. नाही तर रोज शिरुरसारख्या घटनेप्रमाणे महिलांना अत्याचारांच्या प्रसंगांना सोमोरे जावे लागेल, अशी चिंताही दरेकर यांनी व्यक्त केली.

पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांची या प्रकरणांसदर्भात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या निर्दयी घटनेतील नराधमांना तात्काळ अटक करा. पुण्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यासारख्या सांस्कृतिक वैभव असणा-या शहराला असे प्रकार शोभणारे नाही.

पोलिसांचा धाक दरारा संपला आहे. सरकार पण सध्या सत्तेच्या मस्तीत आहे. त्यांना अश्या महिला अत्याचाराच्या गंभीर घटनांकडे बघायला वेळ नाही, अशी टाकाही दरेकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.