Pimpri : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘दर्पण पुरस्कार’ शिवाजीराव शिर्के यांना जाहीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेच्या वतीने मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’चे संस्थापक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने दिला जाणा-या ‘दर्पण’ या पुरस्कारासाठी पिंपरी-चिंचवड येथील ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के यांचे निवड करण्यात आली आहे. 2 हजार 500 रुपये, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

अभ्यासू साहित्यिक तसेच निर्भीड पत्रकार म्हणून ओळख असलेल्या शिवाजीराव शिर्के यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे. पुणे आकाशवाणीसाठी त्यांनी लघुनाटिकांचे लेखन करून त्या सादर केल्या आहेत. त्यांच्या लघुनाटिका आकाशवाणीने अनेक वेळा प्रसारित केल्या आहेत. ‘पवनेचा प्रवाह’ हे साप्ताहिक मागील वीस वर्षांपासून ते नियमितपणे प्रकाशित करीत आहेत.

आजवर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषि, ऐतिहासिक अशा विविध क्षेत्रातील अनेक विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. शोध आदर्श व्यक्तिमत्त्वांचा, कुटुंब लहान सुख महान, राजेशिर्के घराण्याचा कुलवृत्तान्त, शिरकाण अशी ऐतिहासिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

पत्रकारितेच्या माध्यमातून कामगार, ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक आणि समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली असून अनेक विषय मार्गी लावण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात धडाडीने कार्य करणाऱ्या शिवाजीराव शिर्के यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने ‘दर्पण’ हा पुरस्कार त्यांना पत्रकार दिनी जाहीर केला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.