Shivbhojan News : उद्योगनगरीतील गरिबांना मिळतोय ‘शिवभोजना’चा आधार ; 11 केंद्रांवर दररोज 1500 पेक्षा जादा थाळ्यांचे वाटप

एमपीसी न्यूज ( गोविंद बर्गे ) : कोरोनाच्या संकटामुळे राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या परिस्थितीत कष्टकरी, मजूर, बेघर व गरीब नागरिकांसाठी महाविकास आघाडी सरकारची शिवभोजन थाळी मोठा आधार ठरत आहे. पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील एकूण 11 शिवभोजन केंद्रांवर दररोज दीड हजार नागरिकांची भूक भागविली जात आहे. विशेष म्हणजे काही केंद्र चालक मानवतेच्या दृष्टीकोनातून स्वखर्चातून जादा थाळ्यांचे वाटप करीत आहेत. दरम्यान, शिवभोजन थाळ्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता थाळ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केंद्र चालकांकडून करण्यात आली आहे.

राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवभोजन थाळी देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. शिवभोजन थाळीची किंमत 10 रुपये ठेवण्यात आली होती. कोरोना काळात ती 5 रुपयांना देण्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत संचारबंदी लागू करताना शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा केली.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भवामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा काळात कष्टकरी, मजूर, बेघर व गरीब कुटुंबांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळत आहे. गेल्या वर्षी कोरोना काळात शिवभोजन थाळीमुळे लाखो स्थलांतरीत नागरिकांना आधार मिळाला होता.

शिवभोजन केंद्रावर चांगल्या दर्जाचे जेवण दिलं जातं. दोन पोळ्या, भात, वरण आणि एक भाजी असा मेनू आहे. कोरोना काळात शिवभोजन केंद्रावर गोरगरीब नागरिकांचा प्रतिसाद प्रचंड मिळत आहे. कोरोनामुळे सध्या प्रत्येक केंद्रावर पार्सलची व्यवस्था करण्यात आली आहे. अवघ्या तासाभरात केंद्रावरच्या निर्धारित थाळी संपतात.

काही सेवाभावी केंद्र चालक स्वखर्चातून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना मोफत थाळी देत आहेत. केंद्रावर आलेली व्यक्ती उपाशी राहू नये या भावनेतून जादा थाळ्यांचे वाटप केले जात आहे.

शिवभोजन केंद्रांवर शासन निर्धारित 113 थाळ्यांचे वाटप केले जाते. कोरोनात महामारीच्या काळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून त्यामुळे आणखी थाळ्या वाढवून मिळण्याची आवश्यकता आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून स्व:खर्चातून शितळानगर नं. 1, शितळानगर नं. 2, इंदिरानगर, शिवाजीनगर या सर्व झोपडपट्टीतील गरीब, गरजू, घरेलु कामगार, बांधकाम मजूर, अंध, अपंग, वयोवृद्ध, केरसुणी कामगार, भिक्षेकरी, फिरते वारकरी, निराधार यांना जादा थाळ्या घरपोच पार्सल स्वरूपात  देत असल्याची माहिती शिवभोजन केंद्र चालक ( प्रतीक हॉटेल-देहूरोड) संजय धुतडमल  यांनी दिली. 

पिंपरी चिंचवड शहरातील 11 शिवभोजन केंद्रांवर दररोज दीड हजार थाळ्यांचे वाटप होत आहे. काही देहूरोड, देहूगाव आणि सांगवी येथील केंद्रांवर जादा थाळ्यांचे वाटप संबंधित केंद्र चालक स्व: खर्चातून करीत आहेत. सध्या शिवभोजन योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे थाळ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे. दिनेश तावरे : परिमंडळ अधिकारी, अ व ज विभाग.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.