Pimpri : पर्यायी जागा नसल्याने पिंपरी-चिंचवड, भोसरीची मतमोजणी बालेवाडीतच होणार

एमपीसी न्यूज – निवडणुकीकरिता बालेवाडी क्रीडा संकुल ताब्यात घेण्यापूर्वी जागांचे इतर पर्याय तपासण्याचे निर्देश राज्य सरकारने पुण्याच्या जिल्हाधिका-यांना दिल्याने नवीन जागा शोधण्याचा पेच निर्माण झाला होता. अखेरीस, पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने विधानसभा निवडणुकीचे कामकाज बालेवाडी क्रीडा संकुलातून केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडीतच होणार असल्याचे, पुण्याचे जिल्हाधिरी नवलकिशोर राम यांनी आज (शुक्रवारी) स्पष्ट केले.

सार्वत्रिक निवडणुकीकरता बालेवाडी क्रीडा संकुल ताब्यात घेण्यापूर्वी जागांचे इतर पर्याय तपासावेत. जर जागांचे इतर पर्याय व्यवहार्य आणि सोयीचे नसतील त्याचवेळी बालेवाडी क्रीडा संकुलाचा निवडणूक कामकाज वापरासाठी विचार करावा, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने पुणे जिल्हाधिका-यांना दिले होते. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे सहसचिव इ.मु.काझी यांनी याबाबतचे लेखी आदेश 23 सप्टेंबर 2019  रोजी पुणे जिल्हाधिका-यांना बजाविले होते. त्यामुळे नवीन जागा शोधण्याचा पेच निर्माण झाला होता.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी बालेवाडी क्रीडा संकुल जिल्हाधिका-यांमार्फत अधिग्रहीत करण्यात येते. प्रशस्त अशा बॅडमिंटन हॉलमध्ये ईव्हीएम (मतदान यंत्रे) स्ट्रॉँग रूम बनविण्यात येतात. बालेवाडीतील क्रीडासंकुलातच निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया केली जाते. त्यासाठी बॅडमिंटन हॉल परिसरात स्वतंत्र हॉल तयार करण्यात येतात. बालेवाडी क्रीडा संकुल किमान दोन ते तीन महिने जिल्हाधिका-यांच्या ताब्यात असते.

निवडणूक कामकाजामुळे खेळाडूंना खेळांपासून वंचित रहावे लागत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 2017 मध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाने प्रथम इतर पर्यायी जागांचा विचार करावा. त्या जागा गैरसोयीच्या, अव्यवहार्य असल्यास शेवटी बालेवाडी क्रीडा संकुलाचा वापर करण्याविषयी विचार करावा, असे आदेश दिला होता. तसेच कमीत कमी कालावधीसाठी क्रीडा संकुलाचा वापर करण्याची हमी द्यावी, क्रीडांगण, क्रीडा सुविधांची हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश देत जनहित याचिका निकाली काढली.

त्यानुसार शोलय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जिल्हाधिका-यांना आदेश दिले होते. त्यामुळे नवीन जागेचा पेच निर्माण झाला होता. नवीन पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने विधानसभा निवडणुकीचे कामकाज बालेवाडी क्रीडा संकुलातून केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडीतच होणार असल्याचे, पुण्याचे जिल्हाधिरी नवलकिशोर राम यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.