Krishnakumar Kunnath Dies : सुप्रसिद्ध गायक के.के. यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

एमपीसी न्यूज – अगणित लोकांच्या ह्रदयावर आपल्या आवाजाने जादू करणारा सुप्रसिद्ध गायक केके अर्थात कृष्णकुमार कुन्नाथ (Krishnakumar Kunnath) यांचे काल (दि.31) निधन झाले. कोलकाता येथे के. के. यांचा लाईव्ह काॅन्सर्ट संपल्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गायक केके यांच्या जाण्याने अवघ्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून चांगल्या कलाकाराला मुकलो असे म्हणत अगदी जनसामान्यांमधून सुद्धा हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

बाॅलिवूडला साधारण 200 पेक्षाही जास्त सुपरहिट गाणी केके यांनी दिली आहेत. त्यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांपैकी तडप तडप के इस दिल से, अभी अभी, तु जो मिला, ऑंखो में तेरी, खुदा जाने असे एक ना अनेक गाणी अजूनही सगळ्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

गायक केके यांचा काल कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये लाईव्ह कॉन्सर्टचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केके (Krishnakumar Kunnath) यांनी स्वतः सोशल मिडीयावर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली होती. त्यावेळी केके म्हणाले, एक कलाकार जेव्हा रंगमंचावर असतो तेव्हा त्याला एक विशिष्ट ऊर्जा मिळते. एखाद्याची स्थिती काहीही असो, एकदा मी रंगमंचावर आलो की, मी सर्वकाही विसरतो आणि फक्त परफॉर्म करतो,” केके यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर, द मेस्मेरायझर असे आठवणींमध्ये म्हटले होते.

दरम्यान लाईव्ह काॅन्सर्ट संपवून हाॅटेलला परतल्यानंतर केके यांना अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते तिथेच कोसळले. त्यांना तात्काळ सीएमआरआय हाॅस्पिटल येथे नेण्यात आले मात्र डाॅक्टरांनी त्यांना तेव्हाच मृत घोषित केले.

सिनेसृष्टीतील अनेकांनी केला शोक व्यक्त

बाॅलिवूड आणि राजकीय राजकीय अशा अनेक दिग्गजांनी के के (Krishnakumar Kunnath) यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणी जागवल्या, शोक व्यक्त केला.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सोशल मिडीयाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला. शोकसंदेशात पंतप्रधान मोदी लिहितात, केके यांच्या अकाली निधनाने धक्का बसला आहे. त्यांच्या गाण्यातून अपार भावना प्रदर्शित व्हायच्या. सर्व वयोगटातील लोकांमध्ये त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून ते नेहमी आपल्यामध्येच असतील, त्यांच्या आठवणी आपल्यासोबत राहतील. केके यांच्या कुटुंबाप्रति आणि त्यांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सामील आहे.

अभिनेता अक्षय कुमार यांनी सुद्धा केके यांच्या जाण्याने दुःख व्यक्त केेले आहे. अक्षय कुमार म्हणतात, “केकेच्या दुःखद निधनाची बातमी ऐकून अत्यंत दु:ख आणि धक्का बसला. मोठे नुकसान झाले! ओम शांती,” असे अभिनेता अक्षय कुमार यांनी ट्विट केले आहे.

गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्तासह, पापोन अंगराग अशा अनेक सेलिब्रिटींनी दुःख व्यक्त करून केके या जगात नाहीत, यावर आमचा विश्वास बसत नाही असे म्हणून शोक व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.