Mumbai News : नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागेल, एक-दोन दिवसांत लॉकडाऊनचा निर्णय

एमपीसी न्यूज : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागेल. याबाबतचा निर्णय पुढील एक-दोन दिवसात घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काही दिवसांपूर्वी १० हजारच्या आत असलेल्या रुग्णसंख्येने बुधवारी थेट १३ हजारांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबईतील जे जे रुग्णालयात कोरोनाची लस घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘लसीकरणाचा वेग वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे, पण कदाचित काही दिवसांत काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. एक दोन दिवसांत आम्ही याबाबत निर्णय घेणार आहोत. जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे, तिथे लॉकडाऊनचे पाऊल उचलावेच लागेल, असे ते म्हणाले.

‘लस घेण्यासाठी जे पात्र आहेत, त्या सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणे टाळा आणि मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, असे आवाहनही त्यांनी केले. कदाचित आपल्याला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल.

अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. ती जाऊ नये, असे वाटत असेल तर ही बंधने पाळावी लागतील. कोविड लस टोचून घेताना काहीच कळत नाही. लसीबाबत कोणत्याही प्रकारची भीती किंवा संभ्रम बाळगण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.