संविधानामुळे मिळालेल्या अधिकारांनुसार मी माझे जीणे जगतेय : भक्ती शिंदे

एमपीसी न्यूज: “ग्रामीण भागात आजही विधवेचे तोंड पाहणे, पूजाविधीला बोलविणे टाळले जाणे हा अनुभव अनेक महिलांना येतो. पूजाविधीसाठी माहेरी जाण्याचा प्रसंग आला होता तेव्हा वडिलांनी मला ‘मंगळसूत्र काढून ये’ असे बजाविले होते. त्यावेळी मी मंगळसूत्र काढले तर नाहीच पण ‘माहेरी येत नाही’ असे वडिलांना बजाविले.”

श्रावस्ती संस्थेच्या माध्यमातून विधवा, अपंग, एकल महिलांना रोजगाराची साधने देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यास मोलाची मदत करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या भक्ती शिंदे (कोल्हापूर) यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. रंगत-संगत प्रतिष्ठान व करम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 16 ऑक्टोबर) ‘करम सिंदूर : वैधव्य – एक वेगळे वळण’ या अनोख्या उपक्रमाअंतर्गत गौरवपत्र देऊन आयोजित करण्यात आला.

Job Fraud : परदेशात नोकरीचे अमिष दाखवून तरुणीची आठ लाखांची फसवणूक

“सामाजिक कार्यात असताना अडचणी या तर येत असतातच. समाजातील वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी माझे कर्तव्य करीत आले. समाजात वावरताना इतर महिलांची दु:खे पाहिल्यानंतर मला माझे दु:ख फार छोटे वाटले. स्त्री म्हणून मी कुठेही कमी नाही या भावनेतून मी उभी राहिले, अशा भावना सामाजिक कार्यकर्त्या भक्ती शिंदे यांनी व्यक्त केल्या. संविधानामुळे मिळालेल्या अधिकारांनुसार मी माझे जीणे जगत आहे. संविधानाला अभिप्रेत महिलांची जडण-घडण करीत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी  शिंदे यांनी सामाजिक कार्याची ओळख करून देतानाच आयुष्याच्या खडतर प्रवासाची वाटही उलगडून दाखविली. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन यांच्या हस्ते शिंदे यांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले. तर मैथिली आडकर व मुक्ता भुजबले यांनी शिंदे यांच्याशी संवाद साधला.

शिंदे म्हणाल्या, श्रावस्ती संस्थेचे कामकाज पारदर्शक असल्याने संस्थेशी अनेक महिला जोडल्या गेल्या. संस्थेच्या माध्यमातून जेव्हा वेगवेगळ्या घटकातील महिलांशी संपर्क आला तेव्हा तरुण, वृद्ध गटातील एकल महिलांचा प्रश्न गंभीर असल्याचे जाणवले. काही महिलांच्या समस्या माझ्या समस्येपेक्षाही मोठ्या आहेत हे जेव्हा जाणवले तेव्हा अधिक खंबिर होत वाटचाल सुरू ठेवली. सामाजिक कार्य करीत असताना वाईट अनुभवही आले पण त्याकडे दुर्लक्ष करून मार्गक्रमण सुरूच ठेवले. लोकसहभागातून शंभर मुलांच्या शिक्षणाची बाजू सांभाळली आहे.

पतीचे अचानक निधन झाले तेव्हा मुलीने मानसिक धक्क्यातून सावरले. मुलगा कमवित होता. कुटुंबासमोर आर्थिक प्रश्न उभा राहिला तरी समाजासमोर कधी हात पसरले नाहीत असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. सासर-माहेरच्या लोकांकडून चांगले सहकार्य तर मिळालेच पण समाजानेही संस्थेचे कामकाज बघून आधार दिला.
सामाजिक कार्याची सुरुवात केली तेव्हा पतीचे चांगले सहकार्य लाभले, पण गावातील लोकांचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे स्वत:च्या गावात कार्य न करता परिसरातील महिलांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

आजूबाजूच्या गावातील महिलांचा विकास बघितल्यानंतर माझ्या गावातील लोक मदतीसाठी पुढे आले तसेच गावातील समस्या निराकरणासाठी मदतही मागू लागले. असे त्यांनी विशेषत्वाने सांगितले. समाजाकडून आलेली मदत प्रामाणिकपणे तळागाळापर्यंत पोहोचविल्याने माझ्या कार्याविषयी लोकांना विश्वास वाटू लागला. महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विधवा महिलांनाही उखाणा सादर करू द्यावा, यासाठी आवाज उठविल्याचा किस्साही त्यांनी सांगितला.

शिंदे यांचा महिलांसाठी सुरू असलेला संघर्ष ऐकून त्यांच्या संस्थेसाठी ॲड. प्रमोद आडकर यांनी वैयक्तिक मदत जाहीर केली. विधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. वैधव्य दुर्दैवी असते पण हा जीवनाचा शेवट नाही अशी भूमिका विषद करून भूषण कटककर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागिल भूमिका विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन वर्षा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.