Pune : इंग्रजी भाषेचे दास्यत्व स्वीकारणे धोकादायक : डॉ. ज्ञानेश्वर मुळे

रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे प्रा. विश्वास वसेकर यांना काव्य जीवन गौरव पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज : इंग्रजी भाषेचा सुरू असलेला प्रचार प्रसार पाहता नजिकच्या काळात मराठी भाषा जगेल की नाही हा प्रश्न पडू शकतो. (Pune) इंग्रजी भाषेचे दास्यत्व स्वीकारणे ही बाब अत्यंत धोकादायक आहे, असे मत माजी परराष्ट्र सचिव व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले. भाषा वैविध्य जपले तरच सांस्कृतिक वैविध्य टिकेल असेही त्यांनी नमूद केले.

रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा मानाचा काव्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवी, लेखक प्रा. विश्वास वसेकर यांना आज (दि. 16) डॉ. मुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पत्रकार भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी डॉ. मुळे बोलत होते. शाल, श्रीफळ आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. ज्येष्ठ संशोधक डॉ. अविनाश अवलगांवकर आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि मैथिली आडकर व्यासपीठावर होते.

विश्वासपूर्वक कवितेचा वसा घेतलेला कवी अशा शब्दात वसेकर यांच्या लिखाणाचे कौतुक करून डॉ. मुळे म्हणाले, सगळ्या चौकटी मोडू पाहणारा हा कवी आहे. (Pune) हा माणूस कवी म्हणूनच जगतोय हे त्यांच्या कविता वाचताना दिसून आले. गंमत म्हणजे ते सगळ्यांना कोळून प्यायले आहेत पण कुणाचे अनुयायी झालेले नाहीत. ते पुढे म्हणाले, वसेकरांची कविता बहुआयामी आणि बहुपेडी आहे. ती उलगडत जाताना पायघड्यांवरून आपण गर्भगृहाकडे जात आहोत असे वाटते. जिथे गर्भगृहाची सुरुवात होते तिथूनच त्या कवितेच्या श्रीमुखाचे दर्शन होते आणि त्या यात्रेचे सार्थक होते.

Uddhav Thackeray : वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

 

डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, वसेकर यांची कविता संघर्षाची, मानवी जीवनाचे चिंतन करणारी, अंधारात प्रकाशाचे दिवे दाखविणारी आहे. जीवनात काव्य, साहित्यमूल्यात भेदभाव मानणारा असा हा कवी नाही. मानवी जीवनाचे भाष्य त्यांच्या साहित्यातून दिसून येते. विडंबन काव्य लिहिण्यासही चिंतन करावे लागते असे सांगून पोर्ट्रेट पोएम्स हा काव्य प्रकार वसेकर यांनी साहित्यात रुजविल्याचे ते म्हणाले.

डॉ. अविनाश अवलगांवकर म्हणाले, जीवनाला सामावून घेण्याची क्षमता वसेकर यांच्या काव्यात आहे. त्यांची कविता मानवी जीवनाचे चिंतन करणारी आहे.(Pune) मानवी जीवनाची दिशा कशी बदलता येईल याचा प्रयत्न वसेकर यांनी केल्याचे दिसून येते.

ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वाटचालीचा आढावा सादर केला आणि उपस्थितांचे स्वागत केले. मानपत्राचे वाचन उद्धव कानडे यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.