Pune : सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी महापालिकेची जिल्हा प्रशासनाकडे 20 हेक्टर जागेची मागणी

एमपीसी न्यूज – महापालिकेसाठी लागणारी विजेची गरज 100 टक्के सौर ऊर्जेतून पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून स्वतःचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. महापालिकेचा दैनंदिन विजेचा भार 90 मेगावॅट असून ही विजेची गरज पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 50 मेगावॅटचा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून अनुदान दिले जाणार असून या प्रकल्पासाठी 20 हेक्‍टर जागेची मागणी महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे. 

शहरातील पदपथ, महापालिकेची कार्यालये तसेच प्रकल्पांसाठी महापालिकेला दरवर्षी वीज लागते. ही वीज महापालिका महावितरण कडून खरेदी करते. त्यासाठी पालिकेस दरवर्षी 60 कोटी रुपये एवढा खर्च येतो. तसेच वाढत्या विजेच्या दरामुळे हा खर्च अधिकच वाढत चालला आहे.

ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून सौर सिटीचा प्रस्ताव ‘मेडा’कडे पाठवला होता. मात्र, नंतर तो बारगळला त्यानंतर मागील आठवड्यात राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात महापालिकेच्या प्रलंबित प्रश्नांची बैठक घेतली होती.

या बैठकीत महापालिकेने सौरऊर्जा प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून सवलत तसेच अनुदान मिळण्याबाबत विनंती केली होती. यावेळी त्यांनी पालिकेने स्वतःचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा त्यासाठी आवश्यक असलेला निधी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान महापालिकेला उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या. तसेच या प्रकल्पासाठी शहरात एकाच ठिकाणी सुमारे वीस हेक्टर जागा उपलब्ध नसल्याने पालिकेस ही जागा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेकडून जागेच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनास पाठवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.