Pune : झपाटलेपण, समर्पित भावना आणि सकारत्मकता या त्रिसूत्री आयुष्यात यशस्वी – नवनियुक्त भारतीय लष्करप्रमुख मनोज नरवणे

एमपीसी न्यूज – अभियांत्रिकी ड्रॉईंग हा माझा आवडता छंद आणि विषयही त्यामुळे कोणत्याही समस्येकडे तीन कोनातून पाहण्याची सवय शालेय जीवनापासूनच लागली, त्याचा पुढील वाटचालासाठी खूप उपयोग झाला. झपाटलेपण, समपर्ण भावना आणि सकारत्मकता या त्रिसूत्रीवर शालेय शिक्षणाचा भर असल्याने आज जे काही यश संपादन करु शकलो आहे ते त्यामुळेच!, असे उद्गार काढत नवनियुक्त भारतीय लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी  ‘ज्ञान प्रबोधिनी प्रशाले’बाबत आज कृतज्ञता व्यक्त केली.

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल पटांगण, टिळक रोड, पुणे येथे माजी विद्यार्थ्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालया’चे संचालक आणि ‘ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट’चे विश्वस्त डॉ.धनंजय केळकर यांचा ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेवेळी प्राचार्य असलेले यशवंतराव लेले, वामनवराव अभ्यंकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर ज्ञान प्रबोधिनीच्या स्थापनेवेळी प्राचार्य असलेले यशवंतराव लेले, वामनवराव अभ्यंकर, ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट आणि कार्यवाह सुभाष देशपांडे उपस्थित होते. यावेळी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ. मिलींद नाईक, ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या माजी विद्‌यार्थी सुकाणू समितीचे शशांक चांदोरकर आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

नवनियुक्त भारतीय लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे म्हणाले, आयुष्यात ज्या विषयात रस आहे त्यातच काम करा हे आम्हाला शाळेने शिकविले. माझे आजचे यश हे प्रशालेने आमच्या जडणघडणीसाठी केलेल्या सांघिक प्रत्यत्नांचे यश आहे.

‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालया’चे संचालक आणि ‘ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट’चे विश्वस्त डॉ.धनंजय केळकर सत्काराला उत्तर देतांना म्हणाले, गुणवत्ता, संघटन आणि देशप्रम हे गुण आप्पांनी आमच्यात रुजविले. आप्पांनी आमच्या घडविण्यात अनेक प्रयोग केले. आम्ही त्यांच्या या प्रयोगांवर कधीही साशंकता व्यक्त केली नाही. आम्ही शाळेशी इतके एकरुप होऊन गेलो होतो की रविवारी देखील चुकून शाळेत यायचो. आप्पांनी आमच्याकडून धाडसाचे धडे गिरवून घेतले. आम्ही वैयक्तिक खेळ प्रकार निवडण्यापेक्षा सांघिक खेळ निवडावा याबाबत आप्पा आग्रही असायचे. आप्पांनी आमच्यावर केलेल्या प्रयोगांचे महत्त्व आज कळते आहे.

ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट यांनी देखील ज्ञान प्रबोधिनीची भविष्यातील वाटचाल आणि सध्या सुरु असलेल्या वाटचालीवर सविस्तर विवेचन केले. ज्येष्ठ पत्रकार आणि माजी विद्यार्थी सुकाणू समितीचे आनंद आगाशे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

सत्कार समारंभाआधी या महामेळाव्यात दुपारी २.०० वाजेपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात दुपारी २ ते ४ या वेळात प्रशालेच्या गेल्या पन्नास वर्षांतील शिक्षकांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांशी त्यांचा संवादही आयोजित करण्यात आला होता. तसेच पर्यावरण आणि शाश्वत विकास, तंत्रज्ञानाचे जीवसृष्टीवर होऊ घातलेले विविधांगी परिणाम, रोजगारनिर्मितीची आव्हाने आणि राष्ट्रीय एकात्मता या चार विषयांवर प्रबोधिनीच्या माजी विद्यार्थ्यांच्या विशेषगटांनी गेल्या काही काळात केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष कार्यक्रमात सादर केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कंठसंगीत, वाद्यसंगीत, शास्त्रीयनृत्य आदी क्षेत्रांत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा कलाविष्कार सादर करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.