Pimpri: भिंती रंगणार, रस्ते चकाचक होणार, स्वच्छ सर्वेक्षणाच्या तिसऱ्या पर्वास प्रारंभ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात स्वच्छ सर्वेक्षणाच्या तिसऱ्या पर्वास आजपासून सुरुवात झाली. त्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला असून या उपक्रमांतर्गत भिंती रंगविल्या जाणार आहेत, दुभाजक चकाचक केले जातील तर सार्वजनिक शौचालयांची दुरुस्तीही केली जाणार आहे. तसेच क्षेत्रीय अधिकारी आठवड्यातील चार दिवस प्रभागाचा पाहणी दौरा करणार आहेत.

 

स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहिल्या पर्वात सहावा आणि दुसऱ्या टप्प्यात 14 व्या क्रमांकाचे स्थान महापालिकेने मिळविले आहे. आता तिसऱ्या पर्वाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (शनिवारी) आरोग्य विभाग, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विविध सूचना दिल्या आहेत. या बैठकीला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यासह आठही प्रभागांचे क्षेत्रीय अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, उद्यान, झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्विकास, ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता आणि कचरा संकलन करणाऱ्या बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड, ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंत्राटदारांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

कचरा संकलन करणाऱ्या गाड्या दररोज शहरातील सर्व भागांत जातात का, कोणत्या भागात गाड्यांची संख्या कमी आहे, याचा आढावा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला.

 

कंत्राटदारांनी कचरा संकलनासाठी नव्या गाड्यांचा बंदोबस्त करावा. ज्या भागात गाडी जात नाही, त्या भागात दररोज गाडी जाईल याची दक्षता घ्यावी, पाणीपुरवठा विभागाने शहरातील सार्वजनिक स्वच्छगृहातील टाक्यांमध्ये टँकरच्या साहाय्याने पुरेसे पाणी ठेवावे, स्थापत्य विभागाने सार्वजनिक शौचालयातील दरवाजे, खिडक्यांची दुरुस्ती करावी, रस्ते खड्डेमुक्त असावेत, भिंती रंगवाव्यात. दुभाजकांमधील जळालेली झाडे काढून नवीन रोपे लावावीत, विद्युत विभागाने नादुरुस्त दिवे दुरुस्त करावेत, अशा सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आठवड्यातील चार दिवस पूर्ण प्रभागाचा पाहणी दौरा करावा, अशाही सूचना केल्या आहेत.

 

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, की स्वच्छ सर्वेक्षणाच्या तिसऱ्या पर्वास आजपासून सुरुवात झाली आहे. महापालिकेने त्याची पूर्ण तयारी केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाबाबतची जनजागृती केली आहे. 31 जानेवारीपर्यंत केव्हाही सर्वेक्षण होईल. कचरा संकलन करण्यासाठी  ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स हे कंत्राटदार उद्यापासून नवीन 30 गाड्यांची व्यवस्था करणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.