Talegaon : एक वर्षात पुस्तक दान, आदान-प्रदान मोहिमे अंतर्गत राज्यभरात एक लाख पुस्तकांचे वाटप करणार

ज्येष्ठ लेखक व अनुवादकार रवींद्र गुर्जर यांनी पुस्तक दिनादिवशीच केला संकल्प 

मावळ मराठी साहित्य मंडळातर्फे जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा 

एमपीसी न्यूज – ई – बुकचा जमाना आला आहे. त्यामुळे वाचकांचा छापील पुस्तकांकडील कल काहीसा कमी झाला आहे. इंटरनेटच्या जमान्यात पुस्तक प्रकाशनापुढे ई-बुकचे सर्वात मोठे आव्हान आहे. वाचन संस्कृतीचे महत्व सांगण्यासाठी येत्या एक वर्षात पुस्तक दान आदान-प्रदान मोहिमेतून राज्यभरात सुमारे एक लाख पुस्तकांचे वितरण करण्याचा संकल्प ज्येष्ठ लेखक व अनुवादकार रवींद्र गुर्जर यांनी पुस्तक दिनादिवशी केला केला. 

वैद्य खडीवाले यांच्या वंदनीय ताई आपटे सभागृहात आज (सोमवार, दि. 23) पुस्तक दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक व अनुवादकार रवींद्र गुर्जर, लोककला साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, प्रवास वर्णनकार प्रा. शिरिष अवधानी आणि लेखक प्रा. तुकाराम पाटील यांनी पुस्तक लेखन, देशविदेशातील वाचन संस्कृती आणि लेखक-प्रकाशक म्हणून त्यांचे अनुभव कथन केले. यावेळी मंडळाचे खजिनदार अमीन खान, सचिव प्रा. तुकाराम पाटील, संदीप वाळुंज, श्रीकृष्ण पुरंदरे, दत्तात्रेय जोशी, संजय चिटणीस आदी उपस्थित होते. 

रवींद्र गुर्जर यांनी त्यांच्या लेखनारंभापासूनचा प्रवास अधोरेखित केला. यावेळी ते म्हणाले, "चित्रपट पाहण्याच्या छंदातून माझा लेखनाचा पाया पक्का झाला. पॅपिलॉन लिहून प्रकाशीत होईपर्यंत आपण लेखक होऊ, असे वाटले नव्हते. त्यानंतर अनुवादित लेखनावर वाचकांचा प्रतिसाद मिळत गेला आणि 35 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशीत झाली. मराठी भाषेस अभिजात दर्जा मिळणे किमान 500 कोटींचा खर्चिक प्रश्न असून तो मिळाल्यास आणखी तीन भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा द्यावा लागणार आहे. त्यामुळे दोन हजार कोटींचा हा प्रश्न असून तो राजकीयच अधिक झाला आहे. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अवधानी यांनी परदेश गमन, लेखन आणि इंग्रजी साहित्यातील त्यांच्या प्रेरणादायी लेखकांच्या पुस्तकांचा आढावा घेतला. ते म्हणाले, "लंडन मेट्रो स्टेशनवरून प्रवास करताना तेथील प्रत्येक प्रवाशाच्या हातात पुस्तक आणि त्याचे वाचन थक्क करणारे होते. पुस्तके नुसतीच वाचू नयेत तर ती वाचावी आणि सांगावीत. पुस्तक हेच लेखकाचं खरं स्मारक असून ते घराघरात पोचलं पाहिजे. 

प्रभाकर ओव्हाळ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकवाचनाच्या आठवणींना उजाळा दिला. प्रकाशक सुनील देशपांडे यांनी प्रकाशकाच्या व्यथा मांडल्या. यावेळी मंडळाच्या साहित्ययात्रा अनियतकालिकाचे प्रकाशन गुर्जर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कवी आणि कवयित्रींनी कवितावाचनाचा बहारदार कार्यक्रम सादर केला. पुस्तकालयाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. उपस्थित वाचनप्रेमींना प्रा.पाटील लिखित तीन पुस्तकांचे संच पुस्तक दिनानिमित्त भेट म्हणून वाटप करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संभाजी मलघे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्रीकृष्ण पुरंदरे यांनी केले. आभार श्रीकृष्ण मुळे यांनी मानले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.