Talegaon : ‘लॉकडाऊन’मध्ये मराठी अभिमान गीत सादर करीत 90 कलाकारांनी साजरा केला महाराष्ट्र दिन

तळेगाव दाभाडे येथील युवा रंगकर्मी केशर कुंभवडेकर याच्या पुढाकाराने उपक्रम

एमपीसी न्यूज – करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या महाराष्ट्र दिनी कलाकारांना आपापल्या घरीच बसावे लागले. पण त्यांच्या मनातला कलाकार काही स्वस्थ बसू शकला नाही. तळेगावातील केशर कुंभवडेकर या युवा रंगकर्मीने आपल्या 90 युवा सहकलाकारांना घेऊन ‘मराठी अभिमान गीत’ सादर केले. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे कविवर्य सुरेश भट विरचित मराठी अभिमान गीत 2010 साली संगीतकार कौशल इनामदार यांनी गायक, गायिकांना घेऊन सादर केले होते. तळेगावकर केशरने हे गीत 90 युवा हौशी अभिनेते, अभिनेत्रींना घेऊन सादर केले आहे.

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, असे अत्यंत अभिमानाने आपण मराठी जन म्हणतो. यंदा म्हणजे 2020 साली महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाली. खरंतर ही अत्यंत अभिमानाची, आनंदाची आणि जल्लोषाची गोष्ट आहे. पण करोनाच्या सावटाखाली यंदाचा महाराष्ट्रदिन फक्त शासकीय पातळीवरच साजरा झाला.  आपल्याला शाळांमध्ये, कार्यालयात, सोसायट्यांमध्ये महाराष्ट्रदिन साजरा करता आला नाही ही खंत नक्कीच मनात राहणार. पण अशाही प्रसंगात मागे हटेल तो मराठी माणूस कसला याही परिस्थितीत महाराष्ट्रदिनाचे जल्लोषात सादरीकरण करायचे असे तळेगावमधील केशर कुंभवडेकर या युवा नाट्यकर्मीने ठरवले आणि जे ठरवले ते प्रत्यक्षातही आणले. आपल्या 90 युवा साथी कलाकारांसोबत त्याने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या ‘मराठी अभिमान गीता’वर सादरीकरण केले.

काही वर्षांपूर्वी म्हणजे 27 फेब्रुवारी 2010 या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने  गायक, संगीतकार कौशल इनामदार यांनी नामवंत गायक, गायिकांना घेऊन हे ‘मराठी अभिमान गीत’ सादर केले होते.  कविवर्य सुरेश भट यांच्या अजरामर लेखणीतून उतरलेले हे ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे ‘मराठी अभिमान गीत’ आजही मराठी माणसाचा मानबिंदू मानले जाते. अत्यंत समर्पक आणि ओघवते, अंगावर रोमांच उठवणारे, इर्षा, जोष जागृत करणारे हे शब्द ऐकले की आपल्या मराठी असल्याचा अभिमान वाटतो. मराठी अभिमानगीत हे 112 प्रथितयश गायक-गायिकांनी व 356 होतकरु समूहगायकांनी गायले आहे. प्रख्यात शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, अश्विनी भिडे – देशपांडे, गायक सत्यशील देशपांडे, राजा काळे, शाहीर विठ्ठल उमपांपासून अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी, स्वानंद किरकिरे, अजित परब, स्वप्निल बांदोडकर, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायनपर्यंत अनेक गायक, गायिका तसेच अशोक पत्की, श्रीधर फडकेंपासून मिलिंद जोशी, मिथिलेश पाटणकरांपर्यंत बरेच संगीतकार या शिवाय अमराठी असलेले गायक-गायिका म्हणजे हरीहरन, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर अशा अनेकांनी अतिशय प्रेमाने यात सहभाग घेतला आहे.

याच मराठी अभिमान गीताला यावेळी केशर यांनी आपल्या सहकारी युवा होतकरु साथी कलाकारांच्या सोबतीने सादर केले आहे. प्रत्येक रंगकर्मीच्या मनात आपल्या कलेचे काहीतरी अनोखे सादरीकरण करावे ही इच्छा असते. पण या करोना काळात सध्या रंगभूमीवर काहीच सादर करता येत नाही. पण रंगभूमीची ओढ काही स्वस्थ बसू देत नाही असे म्हणतात ते खोटे नाही. त्याच प्रेरणेने केशर यांनी 90 युवा कलाकारांची एकत्र मोट बांधण्याचे ठरवले. संपूर्ण महाराष्ट्रातून हे सर्व हौशी युवा कलाकार या मराठी अभिमान गीताच्या माध्यमातून एकत्र आले आणि एक सुंदर कलाकृती निर्माण झाली. दोन आठवड्यांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून या सर्व हौशी युवा रंगकर्मींना केशरने एकत्र आणले. त्यांच्या होकारानंतर प्रत्येकाला आपापली सादरीकरणाची ओळ देण्यात आली. आणि त्यानंतर प्रत्येकाने आपापला व्हिडीओ त्याच्याकडे शेअर केला. एडिटिंगचे शिक्षण घेणारा आणि त्याची आवड असणा-या केशरने मग हे मराठी अभिमान गीत या सहकारी कलाकारांसोबत सादर केले. महाराष्ट्रातील युवा पिढीच्या मनातदेखील मराठी भाषेचा अभिमान आजही जागृत आहे हे चित्र नक्कीच आशादायक आहे.

 

View this post on Instagram

नमस्कार, मी केशर कुंभवडेकर. लाॅकडाउनच्या अश्या परिस्थितीत, आम्हा कलाकारांचे हाल होत आहेत. आमच्या पासून आमचं प्रेम, आमची सखी, आम्हा कलाकारांची मराठी रंगभूमी, बरीच दुरावली आहे. कधी स्टेज ला स्पर्श करतोय असं झालं आहे. म्हणूनच, मी आपल्या मराठी रंगभूमीच्या ९० कलाकारांना घेऊन, महाराष्ट्रातील अनेक रंगकर्मीं साठी 'लाभले आम्हास भाग्य' गीत सादर करतोय. हे गीत तुम्हाला, १ मै ला माझ्या इंस्टाग्राम व फेसबुक पेज वर पहायला मिळेल. ९० कलाकारांबरोबर लाॅकडाउनच्या वेळी काम करणं एक चॅलेंज होतच, पण ह्या निमित्ताने एवढे कलाकार जोडले गेले आहेत त्याचा जास्त आनंद. आपल्या बर्याच रंगकर्मींची नवे कधी पुढे येतच नाही. ह्या कारणामुळे मी माहाराष्ट्रातुन अनेक कलाकार निवडले आहेत जे नाट्यक्षेत्रात उभे राहू पाहत आहेत, ज्यांना आपण 'बडींग आर्टिस्ट' म्हणू शकतो. माझी आणि माझ्याबरोबर उभे राहिलेल्या सर्व कलाकारांची तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती,… सेफ रहा, आणि आपल्या सोबत आपल्या कलेची सुद्धा काळजी घ्या. … रंगभूमीचा एक चाहता, केशर कुंभवडेकर.

A post shared by Keshar Kumbhavdekar (@captain_barbossa77) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.