Talegaon Crime News: गळा, तोंड दाबून पतीने केला पत्नीचा खून, पोत्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज – गळा आणि तोंड दाबून पतीने पत्नीचा खून केला. व मृतदेह पोत्यात भरून घराजवळ असलेल्या तळ्याच्या चारीत टाकला. तळेगाव दाभाडे येथील कातकरी वस्तीत  बुधवारी (दि.23) रात्री सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खूनाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

तारा नईम शेख (वय 40, रा. कातकरी वस्ती, तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तिचा पती नईम नसरुद्दीन शेख (वय 40, रा. कातकरी वस्ती, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302, 201 अंतर्गत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तारा शेख हिच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर, तिने नईम शेख याच्याशी विवाह केला. मागील दिड वर्षांपासून ते तळेगाव दाभाडे येथे राहत आहेत. दरम्यान, कोणत्यातरी अज्ञात कारणावरून पती नईम याने पत्नी ताराचा गळा आणि तोंड दाबून खून केला.

मयत ताराचा मृतदेह पोत्यात भरून घराजवळ असलेल्या तळ्याच्या चारीत टाकला. आरोपी पती नईम शेख हा मुलांना घेऊन फरार झाला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.