Talegaon Crime News : पूर्ववैमनस्यातून एकावर खुनी हल्ला; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जुन्या भांडण्याच्या कारणातून सहा जणांनी मिळून एकावर खुनी हल्ला करून तलवारीने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 5) सायंकाळी पाचच्या सुमारास तळेगाव दाभाडे हद्दीत हिंदमाता रेल्वे ब्रीजच्या उत्तरेस लोखंडी ब्रिज गार्डजवळ घडली.

गणपत किसन पडवळ (वय 51, रा. तळेगाव दाभाडे, मूळगाव आंबेठाण, ता. खेड, पुणे) यांनी या प्रकरणी बुधवारी (दि. 6) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. असिफ मुलानी, संदेश जाधव, प्रसाद पवार, शिवा दुबे व इतर दोन अनोळखी (नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा ओंकार गणपत पडवळ (वय 26) व त्याचा मित्र अनिल पारधे हे दोघेही दुचाकीवरून जात होते. हिंदमाता रेल्वे ब्रीजच्या उत्तरेस लोखंडी ब्रिज गार्डाजवळ आरोपींनी तीन दुचाकी आडव्या लावून फिर्यादीचा मुलगा ओंकार यांची दुचाकी अडवली. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीच्या मुलास हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तुला लय मस्ती आली आहे काय? तुझी मस्ती उतरवतो तुला आजच खल्लास करून टाकतो, असे आरोपी म्हणाले.

त्यानंतर आरोपी हे ओंकार यांच्या डोक्यात तलवार मारत असताना ओंकार यांनी आरोपीचा हात पकडला. त्यावेळी दुसऱ्या आरोपीने ओंकार यांच्या पोटाच्या दिशेने तलवार मारली असताना ती चुकवताना ओंकार यांच्या कमरेला इजा झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.