Talegaon Dabhade: घाटकोपरवरून आलेली 40 वर्षीय व्यक्ती कोरोना ‘पॉझिटीव्ह’, मावळातील कोरोनाबाधितांची संख्या पाचवर

Talegaon Dabhade: 40-year-old man, who came from Ghatkopar, found corona 'positive', number of corona victims in Mavla at five

1

एमपीसी न्यूज – मावळात आज सलग चौथ्या दिवशीही कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. घाटकोपर येथून आलेल्या तळेगाव दाभाडे येथील राहणा-या 40  वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी आज (शुक्रवारी) दिली. या कोरोनाबाधित व्यक्तीच्या पत्नीचा तसेच माळवाडी येथील एका 40 वर्षीय संशयिताच्या कोरोना चाचणीचा अहवाल मात्र ‘निगेटीव्ह’ आला आहे. तळेगाव दाभाडे येथील प्रभाग क्रमांक नऊचा काही भाग कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून या प्रभागाचा उर्वरित भाग बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

दरम्यान काल (गुरुवार) वेहेरगाव येथील 28 वर्षीय तरूण व चांदखेड येथील 47 वर्षीय व्यक्तीचा चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यापूर्वी बुधवारी नागाथली येथील 42 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळली. आणि मंगळवारी अहिरवडे येथे मुंबईवरून आलेली व्यक्ती पॉझिटीव्ह आढळली होती.

मावळात सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्ण आढळल्यामुळे  चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या आधीचे दोन्ही व आजचा ही रूग्ण  मुंबईतून मावळात आलेला असल्याने मावळात आणखी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईतून मावळात येणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

तळेगाव येथील ही व्यक्ती रोजगाराच्या उद्देशाने मुंबई येथील घाटकोपर परिसरात तीन महिन्यापूर्वी गेली होती. मंगळवार दि 19 रोजी ही 40 वर्षीय व्यक्ती व त्याची पत्नी घाटकोपर येथून लोणावळा जवळ आले असता त्या व्यक्तीच्या आईने स्थानिक नगरसेविका व उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांच्याशी संपर्क साधला व नगर प्रशासनातील अधिकारी प्रवीण माने व स्थानिक नगरसेविका यांनी समन्वय साधून त्याला व त्याच्या पत्नीला शाळा क्रं 5 मध्ये क्वारांटाइन केले. त्यामुळे इतर कोणाच्याही संपर्कात ते आले नाही.

काल (गुरूवारी) त्या 40 वर्षीय व्यक्तीचा व त्याच्या पत्नीचा स्वॅब नमुना चाचणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविला होता. त्याचा अहवाल आज (शुक्रवारी)  प्राप्त झाला. ती 40 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पाॅझिटिव्ह तर त्याच्या पत्नीचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. त्या व्यक्तीला औंध येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची पत्नी निगेटिव्ह असल्याने तळेगाव दाभाडे येथील जनरल हाॅस्पिटलमध्ये क्वारांटाइन केले आहे.

चांदखेड येथील व्यक्ती चार दिवसांपूर्वी खडकी येथे एका अंत्यविधीसाठी गेली होती. तिचाही अहवाल काल  पाॅझिटिव्ह आला होता.  दरम्यान, तळेगाव येथील नर्स पाठोपाठ माळवाडी येथील नर्सनेही कोरोनावर मात केली असून तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

मावळातील अहिरवडे येथे चार दिवसांपूर्वी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्या पाठोपाठ आंदरमावळातील नागाथली येथे कोरोनाचा आणखी एक रुग्ण, सलग तिस-या दिवशी वेहेरगाव व चांदखेड गावात प्रत्येकी एक रूग्ण सापडला आणि आज तळेगावातील एका रुग्णाची भर पडल्याने तालुक्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या पाच झाली आहे.

वेहेरगाव येथील 28 वर्षीय तरूणाचा  कोरोना चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. वेहेरगाव येथील रूग्णाच्या संपर्कातील तीन जणांना तर चांदखेड येथील रूग्णाच्या संपर्कातील तेराजणांना स्वॅब टेस्टसाठी काल पाठविण्यात आले आहे. चांदखेड कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर केले आहे तर चांदखेड लगतची चंदनवडी, पाचाणे, आढले खुर्द ही गावे बफर झोन म्हणून जाहीर केली आहेत.

प्रशासनाने थोडं कठोर होणं लोकांच्या हिताचे आहे.  प्रशासन तरी किती जीव ओतून काम करतेय आहे, ते  कुठे कुठे पुरणार, हे लोकांना कधी कळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकांची दररोज चौका-चौकात उत्सव भरल्या सारखी गर्दी लोटत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काही अपवाद वगळता लोक प्रतिनिधी देखील सक्रिय दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तळेगावातील पहिल्या कोरोनाबाधित नर्सला बरी झाल्यानंतर गेल्या आठवड्यात डिस्चार्ज मिळाला. माळवाडीतील नर्सलाही  तीन दिवसांपूर्वी घरी सोडण्यात आले. त्यानंतर गेल्या चार  दिवसांत पाच नवीन रुग्ण सापडल्याने मावळवासीयांची चिंता वाढली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like