Talegaon Dabhade : कवितेचा जागर करणारे कवी गदिमा – राजन लाखे

इंद्रायणी महाविद्यालयात गदिमांची जन्मशताब्दी साजरी

एमपीसी न्यूज- ‘गदिमा म्हणजे काव्यमय तारा. त्यांचे साहित्य विवेकाच्या पातळीवर विराजमान झाले आहे. भावनात्मकता आणि बौद्धिक यांचा प्रत्यय गदिमांच्या काव्य व गीत लेखनातून दिसून येतो. तसेच रुप सौंदर्य, कल्पना सौंदर्य, भाषासौंदर्य, निसर्ग सौंदर्य यांचा ओतप्रोत मिलाफही गदिमांनी आपल्या काव्यात साधला असल्याचे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष कवी राजन लाखे यांनी व्यक्त केले.

इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे मराठी, हिंदी व इंग्रजी विभाग आयोजित ‘गदिमा: प्रतिभा आणि प्रतिमा’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मराठी विभागप्रमुख डॉक्टर विजयकुमार खंदारे, हिंदी विभागप्रमुख डॉक्टर मधुकर देशमुख, इंग्रजी विभागप्रमुख प्राध्यापक दीप्ती पेठे, कवी राजन लाखे, श्री. अमेय गुप्ते, श्री. रघुनाथ पाटील, श्री. बी. एस. बनसोडे, कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी, प्राध्यापक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख व परिचय प्राध्यापक डॉक्टर संदीप कांबळे यांनी करून दिली.

गदिमा यांचे 2019-20 हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असताना अशा कार्यक्रमाचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलघे यांनी केले.

गदिमांविषयी भावना व्यक्त करताना कवी लाखे म्हणाले, “सत्याधिष्टित प्रतीकांची ओतप्रोत रचना, गीतरामायणाची निर्मितीची ही गदिमांची निर्मिती शक्ती होती. अध्यात्माची प्रचिती गदिमांच्या काव्यातून येते ” यावेळी लाखे यांनी गदिमांची ‘नाच रे मोरा नाच’, ‘गोरी गोरी पान’, ‘झुकू झुकू झुकू आगीनगाडी’, ‘ये रे ये रे पावसा’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, या बालगीतांची आठवण व सादरीकरण करून रसिकांमध्ये चैतन्याची लाट निर्माण केली. कवी गदिमा यांनी आपल्या काव्यात विविध रसांची ओतप्रोत उधळण केल्याची उदाहरणे सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

हास्यरसाचे उदाहरण सादर करताना सामाजिक संदेश गदिमांनी कोणत्या प्रकारे व्यक्त केला, याचे सादरीकरणही लाखे यांनी केले. गदिमांच्या भावगीत, प्रेमगीत, विरहगीत यासारख्या विविधांगी रचनांवर लाखे यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. गदिमा ही तत्त्वज्ञान व विचारांची बैठक असल्याची टिप्पणी करत लाखे यांनी आपल्या भाषणातून गदिमांच्या चित्रपटगीते, काव्यलेखन व्यक्ती आणि व्यक्तिमत्व उलगडून दाखवले.

गदिमा यांचे 2019-20 हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत असताना अशा कार्यक्रमाचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. यानंतर मलघे यांनी मराठीतल्या या मान्यवर कवीची जन्मशताब्दी साजरी करताना अत्यानंद होत असल्याची भावना व्यक्त करत गदिमांचे विविधांगी पैलू विद्यार्थ्यांसमोर यावेत म्हणून महाविद्यालयातील विविध विभागाने घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. मान्यवरांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप कांबळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.