Talegaon Dabhade : हॉटेल न चालविण्याची धमकी देत व्यवस्थापकाला मारहाण

एमपीसी न्यूज – हॉटेल न चालविण्याची धमकी देत गुंडानी हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री साडेअकराच्या सुमारास सोमाटणे येथे इंद्रायणी हॉटेलसमोर घडली.

प्रशांत मंजुनाथ शेट्टी (वय 39, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत सोमाटणे येथील मयूर हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. बुधवारी रात्री हॉटेलमध्ये काही ग्राहकांची आपापसात भांडणे झाली. हॉटेलमध्ये भांडण झाले असल्यामुळे प्रशांत यांनी मध्यस्थी करून ती भांडणे सोडवली. यानंतर रात्री अकरा वाजता प्रशांत घरी जाण्यासाठी बाहेर पडले. दुचाकीवरून घरी जात असताना साडेअकराच्या सुमारास ते पुणे-मुंबई महामार्गावर इंद्रायणी हॉटेल समोर आले असता एक कार (एम एच 14 / 1800) आणि एक दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना ‘तू हॉटेल चालवायचे नाही, चालवले तर तुला बघून घेऊ’ अशी धमकी दिली. त्यानंतर लोखंडी रॉडने प्रशांत यांना मारहाण केली. यामध्ये प्रशांत गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सहाय्यक निरीक्षक अनिकेत हिवरकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.