Pimpri: ‘लोकसभेला मावळ आणि शिरूर मतदारसंघात ‘कमळ’ फुलविण्याचा भाजपचा निर्धार’

चिंचवडमध्ये आढावा बैठक

एमपीसी न्यूज – मावळ आणि शिरुर मतदार संघातून आजपर्यंत भाजपला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. आगामी निवडणुकीत मावळ आणि शिरूर मतदारसंघात ‘कमळ’ फुललेच पाहिजे. या इर्षेने कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. भाजपचे खासदार निवडून आणून मित्र पक्ष शिवसेनेला आपली ताकद दाखवून देण्यात यावी, असा निर्धार भाजपच्या आढावा बैठकीत करण्यात आला.

आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार संघटनात्मक आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आज ( शुक्रवारी) मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचा आढावा सुरू आहे. चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनमध्ये आढावा बैठक सुरू झाली आहे.

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, विजय काळे, सुरेश हळवनकर, प्रशांत ठाकूर, बाळा भेगडे, बाबुराव पाचर्णे, सचिन पटवर्धन, आझम पानसरे, एकनाथ पवार, उमा खापरे, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्यासह मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित आहेत. पिंपरी-चिंचवड मधील मदनलाल धिंग्रा मैदानात येत्या 3 नोव्हेंबरला भाजपची सभा होणार आहे. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘मावळ आणि शिरुर मतदार संघातून आजपर्यंत भाजपला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. आता येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघात आपली ताकद दाखवून देतील. पिंपरी-चिंचवड शहरात जे पिकते ते राज्यभर खपते. शहरातून राज्याची राजकीय हवा तयार होते. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पिंपरीतून फुटवा अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. त्यानुसार तीन नोव्हेंबरच्या सभेत प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे’, असेही ते म्हणाले.

‘आगामी लोकसभेला मावळ आणि शिरूर मतदारसंघात ‘कमळ’ फुललेच पाहिजे. या इर्षेने कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. भाजपचे खासदार निवडून आणून मित्र पक्ष शिवसेनेला आपली ताकद दाखवून देण्यात यावी’, असे आमदार सुरेश हळवनकर म्हणाले.

आमदार बाळा भेगडे म्हणाले, ‘मावळत पक्षाची संघटना मजबूत आहे. नगरपरिषद, पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात आहेत. सर्व सत्ता केंद्र भाजपच्या ताब्यात आहेत’

भाजपचे संघटनमंत्री विजय पुराणिक संघटनेचा आढावा घेत आहेत. बूथ संघटनेची माहिती घेत आहेत. तीन नोव्हेंबरच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला किती कार्यकर्ते येणार आहेत याची माहिती घेतली जात आहे.

चिंचवड मतदार संघातून केवळ दहा हजार कार्यकर्ते ?

चिंचवड मतदार संघातुन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेला दहा हजार कार्यकर्ते येथील असे आढावा देताना सांगण्यात आले. त्यावर संघटनमंत्री विजय पुराणिक म्हणाले, “सगळे चिंचवड मतदार संघावर अवलंबून असताना केवळ दहा हजारच कार्यकर्ते सभेला येणार?” त्यानंतर 15 हजार कार्यकर्ते आणले जातील असे सांगण्यात आले. आळंदीतुन 15 हजार कार्यकर्ते आणू असे सांगितल्यानंतर चिंचवडवाल्यानी हे लक्षात घ्यावे, असे पुराणिक म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.