Chinchwad : टोळक्याकडून कारची तोडफोड; चिंचवड परिसरात दहशतीचे वातावरण

एमपीसी न्यूज – सात जणांच्या टोळक्याने लोखंडी कोयते आणि दगड मारून कार आणि पत्र्याच्या शेडची तोडफोड केली. तसेच परिसरातील नागरिकांना धमकी दिली. ही घटना रामनगर चिंचवड येथे गुरुवारी (दि. 25) मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.

युवराज शाम माने (वय 36, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिजित जोशी (वय 30), करण मोहिते (वय 23), अजित आखाडे (वय 27), विनोद विलास घोडके, अजित प्रकाश पाटील, गोपाळ नवनाथ जाधव (वय 22), शकील गफार अंगारखे (वय 21), धीरज संजय बिराजदार (वय 20, सर्व रा. लालटोपी नगर, मोरवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री एक वाजता वरील आरोपी रामनगर मधील राम मंदिरासमोर महापालिकेच्या मोकळ्या जागेत आले. त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या लोखंडी कोयते आणि दगड युवराज यांच्या कारवर मारून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर युवराज यांचे घराजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडची तोडफोड केली. तोडफोडीचा आवाज ऐकून परिसरातील लोक बघू लागले असता अजित आखाडे याने कोयत्याचा धाक दाखवून ‘आमच्यामध्ये कोणीही यायचे नाही, नाहीतर खल्लास करून टाकीन’ अशी धमकी दिली. यानंतर युवराज यांनी आरोपींना तोडफोडीचा जाब विचारला असता अभिजित याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.