Talegaon Dabhade News : सायकल चालविणे हा शरीरासाठी उत्तम व्यायाम – जॅकी श्रॉफ

एमपीसी न्यूज – प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. येणाऱ्या पिढीला चांगले आरोग्य देणे, ही आपली जबाबदारी आहे. चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आहाराबरोबरच चांगला व्यायामही आवश्यक आहे आणि सायकल चालविणे हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे, असे मत नाममवंत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी व्यक्त केले.

पुलवामा हल्ल्याच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आमदार सुनील शेळके फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सद्भावना सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमास आमदार सुनील शेळके, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पोलीस महानिरीक्षक संजय लटकर, उपमहानिरीक्षक बिपेंद्र टोपो, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल अनिल परमार, सहायक प्रांतपाल गणेश कुदळे, रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष संतोष शेळके, संस्थापक विलास काळोखे, प्रकल्पप्रमुख दिलीप पारेख, सचिव दीपक फल्ले, संयोजन समिती सदस्य सुरेश शेंडे, किरण ओसवाल, विजय कदम, शरयू देवळे, रेश्मा फडतरे, शाहीन शेख, वैशाली खळदे, संजय मेहता, नितीन शहा, मनोज ढमाले, बाळासाहेब रिकामे तसेच सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

जॅकी श्रॉफ म्हणाले की, आज व्हॅलेंटाईन डे असला तरी बाकी सगळे फक्त प्रेम करणार. कोणी बरोबर येणार नाही. आपणच यायचे आणि आपणच जायचे असते. शेवटी एकटा जीव सदाशिव असतो. मुलांनो शरीर पहिले असते त्यामुळे चांगले शरीर कमवा. प्रथम स्वतः, मग परिवार, हे लक्षात ठेवा. विमानात गेलं तरी ऑक्सिजन आधी स्वतःला मग इतरांना. चांगल्या खाण्या- पिण्याबरोबरच आणि उत्तम व्यायाम करून शरीर कमवा.

_MPC_DIR_MPU_II

आमदार सुनील शेळके यांनी मावळवासीयांच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. आजही तो दिवस आठवला तरी जवानांचे बलिदान आठवून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. देशासाठी जवानांनी केलेले बलिदान कधीही विसरले जाणार नाही. शहीद जवान आणि त्यांच्या परिवारांविषयी सद्भावना व्यक्त करण्यासाठी या सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सीआरपीएफचे महानिरीक्षक लटकर म्हणाले की, आम्ही खाकी वर्दीत असलो तर देशाचा प्रत्येक नागरिक हा पोलीस आहे. देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने सदैव सतर्क राहण्याची गरज आहे.

या सद्भावना सायकल रॅलीमध्ये 1100 विद्यार्थी व युवक-युवतींनी भाग घेतला होता. तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौकातून रॅलीचा प्रारंभ झाला. तेली आळी, बाजारपेठ, गणपती चौक, शाळा चौक, जिजामाता चौक, नगर परिषद, हिंदमाता भुयारी मार्ग, इंद्रायणी महाविद्यालय, स्टेशन चौक, जिजामाता चौक या मार्गे मारुती मंदिर चौकात रॅलीचा समारोप झाला.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष संतोष शेळके यांनी प्रास्ताविक केले तर प्रकल्पप्रमुख दिलीप पारेख यांनी आभार मानले. अनिल धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1