Talegaon Dabhade News : सरस्वती विद्या मंदिर शाळेत नगरसेवक निखिल भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पेन देऊन स्वागत

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आज (सोमवार, दि. 4) पासून सुरु झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी तळेगाव दाभाडे, यशवंतनगर येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थानिक नगरसेवक निखिल भगत यांनी पेन देऊन स्वागत केले. तसेच भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना यावेळी पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले.

यावेळी सरस्वती विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, विश्वास देशपांडे, ज्योती चोळकर, मुख्याध्यापिका रेखा परदेशी, राजेश बारणे, अ‍ॅड. संविद पाटील आदी उपस्थित होते.

नगरसेवक निखिल भगत म्हणाले, ‘कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे दीड वर्षांपेक्षा अधिक काळ शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी घरात बंदिस्त राहून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे मोठे जिकरीचे होत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सरकारने शाळा सुरू करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत येऊन नक्कीच आनंद होणार आहे. त्यांचा आनंद द्विगुणित होण्यासाठी पहिल्या दिवशी पेन देऊन त्यांचे स्वागत केले आहे. तसेच सरकारच्या वतीने देण्यात येणार्‍या पाठ्यपुस्तकांचेही पहिल्याच दिवशी वाटप केले आहे.’

विद्यार्थ्यांनी सुरक्षित अंतर पाळावे, मास्क घालावा, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही नगरसेवक भगत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.