Hinjawadi Crime News : गाडीसह अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका; 71 पोलिसांच्या 60 तासांच्या अथक प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज – मारुंजी येथील दिगंबर चितोडीया (वय 32) हे त्यांच्या अल्टो कार गाडीसह मिसींग झाल्याची तक्रार त्यांचा भाऊ राजा चितोडीया यांनी 28 सप्टेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर राजा यांना एक फोन आला व त्यांच्या भावाला सोडण्यासाठी आरोपींनी 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. यानंतर पोलिसांनी सूत्रे हलवून तपासाला सुरुवात केली. हिंजवडी पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखा युनिट चार, खंडणी विरोधी पथक, दरोडा विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक आणि सायबर विभागाच्या 14 अधिकारी आणि 57 पोलीस कर्मचारी अशा एकूण 71 पोलिसांनी तब्बल 60 तास परिश्रम करत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका करत सहा जणांना अटक केली आहे.

प्रविण सुरजसिंग चितोडीया (वय 24, रा. शांताई हॉस्टेल जवळ, शिंदे वस्ती, मारुंजी पुणे), वामन मारूती शिंदे (वय 39, रा. फॉरेस्ट नाका, के. बी. रोड, हनुमान मंदीर जवळ, अंबरनाथ ठाणे), दिलीप सत्तन पासवान (वय 32, रा. फॉरेस्ट नाका, के. बी. रोड, हनुमान मंदीर जवळ, अंबरनाथ ठाणे), द्रुपचंद श्रीशिवलाल यादव, (वय 38, रा. फॉरेस्ट नाका, के. बी. रोड, हनुमान मंदीर जवळ, अंबरनाथ ठाणे), योगेंद्र श्रीरामचंद्र प्रसाद (वय 25, रा. रूम नं 147, फॉरेस्ट नाका, के. बी. रोड, हनुमान मंदीर जवळ, अंबरनाथ वेस्ट, ठाणे), संदीप प्रकाश सोनावणे (वय 38, रा. परशुराम मल्हार, बी विंग 502, मोरवली पाडा, अंबरनाथ इस्ट ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

असा घडला अपहरण आणि सुटकेचा थरार!

28 सप्टेंबर रोजी राजा यांनी त्यांचा भाऊ गाडीसह बेपत्ता असल्याची तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली. दाखल मिसींगचा पोलीस शोध घेत असताना पहाटे पाच वाजच्या सुमारास मिसींग झालेल्या व्यक्तीच्या नंबरवरून त्याच्या भावाला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. दिगंबर यास जिवंत सोडायचे असेल जर 25 लाख रुपये आम्ही सांगेल त्या ठिकाणी आणून द्या, अशी मागणी करून फोन ठेऊन दिला. निनावी फोन आल्यावर अपहरण झालेल्या दिगंबरचा भाऊ पोलीस स्टेशनला आला व भावाचे अपहरण झाल्याबाबत पोलीसांना माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावंत यांनी तात्काळ पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांना घटनेची माहिती दिली. पोलीस आयुक्त यांनी याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या. दिगांबरचे अपहरण झाले असले तरी गुन्हा दाखल केल्यास अपहरण झालेल्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची शक्यता गृहीत धरून स्टेशन डायरी नोंद करून तपास करण्याच्या सूचना दिल्या.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, गुंडा विरोधी पथकाचे हरीश माने यांची टीम मदतीला पाठवली व हिंजवडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक काटे, पोलीस उपनिरीक्षक कदम, गाढवे, साळुंके यांची वेगवेगळी पथके तयार करून एक्सप्रेस हायवे व हिंजवडी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहिम सुरू केली.

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक टिम ठाणे शहर मधील अंबरनाथ या ठिकाणी पाठवली. 29 सप्टेंबर रोजी आरोपींनी अपहरण केलेल्या दिगंबरच्या भावाच्या फोनवर फोन करून किती पैसे जमा झाले याची माहिती विचारली. पैसे तयार झाले असतील तर पैसे घेवून पुणे स्टेशन परिसरात बोलावले. याकरीता अतिशय काळजीपूर्वक प्लॅन करून श्रीराम पौळ, बाळकृष्ण सावंत, प्रसाद गोकुळे यांनी आरोपींना पैसे देण्यासाठी लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा दोन हजार रुपयासारख्या दिसणा-या नोटा उपलब्ध करुन घेतल्या. त्यावर दोन हजाराच्या ओरीजनल नोटा लावून प्लॅस्टिकच्या पिशवीत वीस लाख रुपयाचे बंडल तयार केले व पुणे स्टेशन परिसरात सापळा रचला.

परंतु, आरोपींनी रात्री परत फोन केला नाही. त्यामुळे पोलीसांनी पहाटे सापळा परत बोलावला. अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अपहरण झालेल्या तरुणाच्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घेऊन आरोपींच्या फोनची वाट पाहण्यास सांगितले. तसेच या कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता पाळून पोलीस कारवाईचा कोणालाही थांगपत्ता लागू नये याबाबत महत्वाच्या सूचना दिल्या. दरम्यानच्या काळात साध्या वेशातील पोलीसांनी मारुंजी, कारसासाई, जांबे, हिंजवडी परिसर पिंजुन काढला, मात्र कोणताही सुगावा लागला नाही.

30 सप्टेंबर रोजी सांयकाळी सात वाजता पुन्हा आरोपीचा फोन आला व पोलीसांना न सांगता पैसे घेऊन येण्यास सांगितले. जर पोलीसांना कळवले तर दिंगाबरला जिवंत परत पाठवणार नाही अशी धमकी दिली. सुरुवातीला पैसे कोठे घेऊन यायचे हे काहीही सांगितले नाही. त्यामुळे पोलीस कशा पध्दतीने सापळा लावायाचा याचा विचार करीत होते. सर्व टिम साध्या वेशात प्लॅन करत असताना रात्री दीड वाजता आरोपीचा फिर्यादी यांना फोन आला व पैसे घेऊन ताबडतोब लोणावळ्याला बोलावले. लोणावळ्याला येताना टु व्हीलरवर एकटयाने ये असे धमकावून सांगितले. त्यानंतर पोलीसांनी सापळा रचला. खोपोली आणि लोणावळा शहर व ग्रामीणच्या पोलीसांना याबाबत माहिती दिली. फिर्यादीची अल्टो कार (एम एच 04 / टी सी 2597) असून पुढील सूचना मिळेल त्याप्रमाणे कारवाई करणेबाबत पोलिसांना सांगण्यात आले.

अपहरण झालेल्या दिंगबरचा भाऊ राज चितोडीया यांच्या गाडीवर एक पोलीस अंमलदार साध्या वेशात बसवून लोणावळा येथे पहाटे चारला टीम पोहचली. आरोपींनी एकट्या राजेशला पुढे येण्यास व सोबत कोणी आणू नये अशी फोनवर पुढे खोपोली घाटात एकटाच येण्याची सूचना दिली. त्यानंतर अपहरण झालेल्या तरुणाच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेऊन खोपोली पोलीसांना व लोणावळा पोलीसांना फिर्यादीच्या अल्टो कार क्रमांक कुठे दिसत असेल तिथे योग्य काळजी घेऊन ताब्यात घेण्याची पोलिसांनी सूचना दिली.

दरम्यान, इकडे सुरक्षित अंतर ठेऊन राजा चितोडीया याला पैसे घेऊन पुढे पाठवले. त्यांच्या पाठीमागे व पुढे साध्या वेशातील पोलीस खाजगी वाहनातुन रवाना झाले. अशा रितीने सापळा कारवाई चालत असतांना खोपोली पोलीसांना संशयित अपहरण झालेल्या दिगांबरची अल्टो कार शिळफाटा याठिकाणी दिसून आली व त्यांनी तशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस पथकाला दिली. त्यानंतर अलगदपणे काळजी घेऊन खोपाली पोलीसांच्या मदतीने अल्टो गाडीला व त्यामध्ये असलेल्या पाच आरोपींना ताब्यात घेऊन अपहरण झालेल्या दिगंबर चितोडीया यांची सुटका केली.

या अपहरण कटाचा मास्टर माईड हा मारुंजी येथे राहणारा प्रविण सुरजसिंग चितोडीया होता. पोलिसांनी प्रविण चितोडीया याला मारुंजी येथून ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याने अपहरण केलेल्या दिगंबर यास अंबरनाथ येथे एका रुममध्ये बंद करून ठेवले होते. त्याचे सिम कार्ड त्याच्या एका आयटेल कंपनीच्या मोबाईलमध्ये टाकले होते.

प्रविण चितोडीया हा त्याच्या स्वतःच्या मोबाईल फोनवरुन अंबरनाथ येथे अपहरण करुन ठेवलेल्या दिगंबरजवळ असलेल्या वामन शिंदे याच्या मोबाईलवरून फोन करायचा व आपल्या मोबाईलचा लाऊड स्पिकर ऑन करायचा. त्याचवेळी आयटेल कंपनीच्या मोबाईल वरुन दिगंबर यांच्या भावाला फोन करुन दोन्ही मोबाईल फोन जवळ ठेवायचा व 25 लाख रुपये खंडणीची मागणी करायचा. त्यामुळे खंडणीची मागणी करणाऱ्या फोनचे लोकेशन हे मारुंजी येथे येत असल्याने तांत्रिक विश्लेषण करताना अडचणी येत होत्या.

गुन्हा घडल्याचे कळताच पोलीस आयुक्तांनी हिंजवडी पोलीस ठाण्याचे 4 अधिकारी 20 अंमलदार, गुन्हे शाखा युनिट चारचे 2 अधिकारी व 10 अंमलदार, गुन्हे शाखा दरोडा विरोधी पथकचे 2 अधिकारी 7 अंमलदार, गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकचे 2 अधिकारी व 8 अंमलदार, गुन्हे शाखा गुंडा विरोधी पथकचे 2 अधिकारी 7 अंमलदार, तसेच सायबर विभागाचे सीडीआर विश्लेषण करणारे 2 अधिकारी व 5 अंमलदार असे सर्व मिळून 14 अधिकारी व 57 अंमलदार या विशेष पथकाने 60 तास अथक परिश्रम करून अपहरण नाट्याचा गुंथा सोडवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.