Talegaon : गोठ्यात बांधलेल्या दोन बैलांचा थायमेटसदृश्य पदार्थ खाल्ल्याने मृत्यू

एमपीसी न्यूज – गोठ्यात बांधलेल्या दोन बैलांचा थायमेटसदृश्य पदार्थ खाल्ल्याने मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी (दि. 27) सकाळी नऊच्या सुमारास वारंगवाडी येथे उघडकीस आला.

पांडुरंग रखमाजी वारिंगे (रा. वारंगवाडी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, वारंगवाडी मावळ येथील शेतकरी पांडुरंग रखमाजी वारिंगे यांच्याकडे दोन बैल आहेत. त्यांचे गावापासून एक किलोमीटर अंतरावर शेत असून शेतातील गोठ्यावर त्यांचे बैल बांधायला असतात. नेहमीप्रमाणे रविवारी संध्याकाळी गोठ्यावर बैलांना वैरण चारा घालून वारिंगे हे रात्री घरी आले. सोमवारी सकाळी पुन्हा शेतावर गेले. त्यावेळी त्यांना दोन्हीही बैल बांधलेल्या अवस्थेत मृत्यूमुखी पडल्याचे दिसले.

तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे काॅन्स्टेबल विठ्ठल काळे आणि त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तळेगाव दाभाडे पशुधन विकास अधिकारी डाॅ. रूपाली दडके व वडगाव मावळ येथील पशुधन विकास अधिकारी डाॅ. अजय सुपे यांनी बैलांचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात दोन्ही बैलांच्या पोटात थायमेट (thymate)सदृश्य विषारी पदार्थ आढळून आल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

शवविच्छेदन अहवालात निघालेल्या विषारी द्रव्याचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे डाॅ. दडके यांनी सांगितले. दोन बैलांपैकी एका बैलाचे वय पाच आणि दुसऱ्या बैलाचे वय सात वर्ष होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.