Talegaon News: किशोर आवारे यांच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना किराणा किट वाटप

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या वतीने संपावर असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आज (शनिवारी) किराणा किटचे मोफत वाटप करण्यात आले. एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा आज 111वा दिवस होता.

संपकाळात 111 दिवस किशोर आवारे यांनी दोन्ही वेळचे जेवण एसटी बांधवांना उपलब्ध करून दिले आहे. तसेच मागील महिन्यातही किराणाचे किट वाटप करण्यात आले होते.

कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून पगार मिळत नसून विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम असल्यामुळे कर्मचारी बांधवांची आर्थिक ओढाताण होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत किराणाचा प्रश्न, वैद्यकीय औषधांचा प्रश्न, लहान मुलांची फी सुद्धा भरणे त्यांना अवघड झाले आहे एसटी कामगार बांधवांची आर्थिक हेळसांड कमी व्हावी यासाठी किराणाचे किट किशोर आवारे यांनी एसटी कर्मचारी बांधवांना उपलब्ध करून दिले आहेत.

या किटमध्ये एक महिना पुरेल एवढा किराणामाल आवारे यांनी उपलब्ध करून दिला आहे. आज सर्व एसटी कामगार सर्व कुटुंबासह एसटी आगारासमोर सुरु असलेल्या उपोषण स्थळी उपस्थित होते.

जनसेवा विकास समितीचे सर्व कार्यकर्ते नगरसेवक यांनी सर्व कामगार बांधवांची आपुलकीने विचारपूस केली. एसटी कामगार नेते दीपक दगडखैर यांनी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांचे आभार मानले.

गेले एकशे अकरा दिवस सर्व राजकारणी लोकांनी पाठ फिरवून देखील सातत्याने दोन्ही वेळचे जेवण देणारा दानशूर नेता हा केवळ किशोर भाऊ आवारे असून कामगारांच्या आर्थिक अडचणी मध्ये आमच्या कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे किशोर भाऊ आमच्या पाठीशी सातत्याने उभे राहिल्याने आज आमच्या आर्थिक अडचणी कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी किशोर आवारे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात सामील असून इथून पुढे देखील काही मदत लागल्यास करण्यास तयार असल्याचे आश्वासन दिले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांचे राजकारण न करता त्यांच्या मागण्यां चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी अपेक्षा किशोर आवारे यांनी व्यक्त केली.

किशोर आवारे हे निस्वार्थी राजकीय व सामाजिक नेते असून तळेगावातील अनेक संकटांच्या प्रसंगी किशोर आवारे हे नेहमी समाजाच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले आपण सर्वांनी पाहिले आहे. किशोर आवारे यांचे करोना काळातील कार्य महान असल्याचे गौरवोद्गगार सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती फलके यांनी काढले.

याप्रसंगी समितीचे नगरसेवक समीर खांडगे ,रोहित लांघे प्रवक्ते मिलिंद अच्युत, चंदन कारके, सुनील पवार, दीपक कारके, एसटी कामगार नेते दीपक दगडखैर, प्रशांत शेवाळे, प्रमोद नगरचे, विजय राऊत बबन ढाकणे, धनंजय मुंडे आदी कामगार नेते व कामगार बांधवांचा परिवार उपस्थित होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.