Talegaon News : खोदकाम केलेल्या रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी मजबुतीकरण व डांबरीकरण करावे – वैशाली दाभाडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरात भुयारी गटरांचे आणि जलवाहिनीसाठी खोदकाम केलेल्या रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी मजबुतीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी माजी उपनगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका वैशाली प्रमोद दाभाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत प्रभारी मुख्याधिकारी नानासाहेब कामठे व नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी दाभाडे यांच्या समवेत नगरसेविका मंगल भेगडे व नगरसेविका संगीता शेळके उपस्थित होत्या.

वैशाली दाभाडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव शहराच्या विविध भागात नगरपरिषदेच्या माध्यमातून भुयारी-गटर योजनेची कामे सध्या चालू आहेत. त्यासाठी रस्त्यांच्या मध्यभागी डांबरी रस्ते खोदले आहेत. तसेच शहरात पाणी योजनेच्या जलवाहिन्यांसाठी डांबरी रस्ते खोदले जात आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांची मोठया प्रमाणावर दुर्दशा झालेली आहे.

तळेगाव परिसरातील डांबरी रस्ते खोदल्यामुळे अनेक छोटे मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे त्या खड्यांत पावसाचे पाणी जमा होऊन तिथे चिखल होऊन अपघात व दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या समस्यां सोडविणे गरजेचे आहे. रस्त्यावरील छोटे मोठे खड्डे बुजवावेत असेही म्हटले आहे.

येत्या काही महिन्यात पावसाळा सुरू होणार असल्याने या पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण होणे गरजेचे आहे. भुयारी गटर योजना व पाणी योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यांचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण तातडीने करावे त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन पाणी त्याठिकाणी साचणार नाही, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.