Talegaon News : कायमस्वरूपी मुख्याधिकारी त्वरित नियुक्त करावेत – गणेश काकडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक त्वरीत करावी अशा आशयाची मागणी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते गणेश काकडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

काकडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची बदली होऊन सुमारे तीन महिने होऊन सुद्धा रिक्त पदावर नवीन कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक झाली नसल्याने सर्वच प्रशासकीय कामांना खीळ बसली असल्याचे काकडे यांनी नमूद केले आहे.

तसेच कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने धोरणात्मक निर्णय घेण्यास मर्यादा येत आहेत.

मुख्याधिकारी यांना नगर परिषदेच्या प्रशासकीय व कार्यात्मक कारभारा बाबतचे अधिकार नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 व त्याला अनुलक्षून नगर परिषदेच्या कारभारासाठी जिल्हा अधिकारी यांचे मंजुरीने तयार केलेले 41 उपविधी व तसेच शासनाचे अधिनियम जसे महाराष्ट्र प्रदेश नगर रचना अधिनियम 1966, जन्म मृत्यू अधिनियम, वृक्ष अधिनियम या नुसार विविध अधिकार प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने येणारी कर्तव्ये व जबाबदारी मुख्याधिकारी यांना पार पाडावी लागतात. मुख्याधिकारी यांनी अध्यक्ष यांचे नियंत्रण, निर्देश यांच्या अधीन राहून नगर परिषदेच्या वित्तीय व कार्यात्मक प्रशासनावर नियंत्रण ठेवायचे आहे. नगर परिषदेच्या सर्व ठरावाची अंमलबजावणी करणे, नगर परिषदेचे लेखे व अभिलेखे योग्य नमुन्यात ठेवणे, नगर परिषद लेखा परिक्षकांकडून लेख्या संबंधी अधिनियमितता दर्शवण्यास आल्यास ती दूर करणे, नगर परिषदेच्या सर्व विभागांवर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आदी जबाबदरी पार पाडायची असते. असेही काकडे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

मागील आठवड्यात मुख्यधिकारी नसल्याने अग्निशमन बंबात डिझेल नसल्याची घटना घडली होती, तसेच पाणी पट्टी बिलाबाबतचा निर्णय मुख्याधिकारी नसल्याने प्रलंबित राहिला असल्याचेही म्हटले आहे.

मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक त्वरित करावी त्यात कोणीही राजकारण करू नये असे गणेश काकडे यांनी या वेळी नमूद केले. स्वच्छ सर्वेक्षण या शासनाच्या उपक्रमात तळेगाव नगर परिषदेला अव्वल स्थानी नेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हातभार लावण्याचे आवाहनही काकडे यांनी या वेळी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.