Talegaon : तळेगाव दाभाडे नगरपरिषद राज्यात विकासाचे मॉडेल करणार – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज – मंत्रीपदामुळे मावळच्या जनतेची ताकद वाढली आहे. मंत्रिपदाचा कालावधी कमी असला तरी मंत्रिपदाच्या काळातील १०० दिवसांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद राज्यात विकासाचे मॉडेल करणार असल्याचे कामगार व पर्यावरण राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी येथे केले.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील हिंदमाता रेल्वे भुयारी पुलाचे, जैव विविधता उद्यानाचे, मारुती मंदिर चौक व जिजामाता चौक येथील व्यापरी संकुलाचे, पाणीपुरवठा आदि १५८ कोटी रुपयांच्या निधीतून रविवार (दि.३०) रोजी विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभात भेगडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग बारणे होते.

यावेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, सभागृह नेते सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, मुख्याधिकारी वैभव आवारे, कार्याध्यक्ष रवींद्र आवारे, माजी नगराध्यक्ष सुरेशभाई शहा, बाळासाहेब जांभुळकर, अंजलीराजे दाभाडे सरकार, रवींद्रनाथ दाभाडे, चंद्रकांत शेटे, भाजपाचे जिल्हा प्रभारी गणेश भेगडे, इंदरशेठ ओसवाल, राजेंद्र जांभुळकर, श्यामराव दाभाडे, गिरीश खेर, सुनील पवार, उमाकांत कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, बांधकाम सभापती संतोष शिंदे, शिक्षण समिती सभापती कल्पना भोपळे, आरोग्य समिती सभापती रोहित लांघे, महिला व बाल कल्याण सभापती प्राची हेंद्रे, उपसभापती काजल गटे, नगरसेवक अरुण भेगडे, अमोल शेटे, संदीप शेळके, विभावरी दाभाडे, नीता काळोखे, शोभा भेगडे, संध्या भेगडे, मंगल जाधव, अनिता पवार, सुनील कारंडे, मायमर मेडिकल कॉलेज च्या विश्वस्त सुचित्रा नांगरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

भेगडे म्हणाले की, मावळ तालुक्यात औद्योगिक क्षेत्र अधिक असून कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मावळ तालुक्यात कामगार कल्याण केंद्र
मंडळ सुरु करणार आहे. तळेगाव दाभाडे – चाकण राष्ट्रीय मार्ग ५६ चे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तळेगाव दाभाडे शहराला जोडणाऱ्या डीपी रस्त्यांचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. तळेगाव दाभाडे गाव भागातील रस्ते रुंद करण्यात येणार आहेत.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले कान्हे रेल्वे उड्डाणपूलासाठी २४ कोटी रुपये मंजूर झाले असून तळेगाव दाभाडे हिंदमाता रेल्वे भुयारी पुलाचे उद्घाटन झाले असेच वडगाव, जांभूळ, कान्हे, नाणे गेट, संगीसे आदी भागात रेल्वे भुयारी पुलांचे काम सुरु करण्यात येणार आहे. पुणे – लोणावळा रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाचे सर्व्हेक्षण झाले असून मार्ग करण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. मिसाईल प्रकल्पाच्या शेतकऱ्यांच्या जमिनीला वाढीला मोबदला देण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून हे शासन शेतकऱ्यांचे हित जोपासणारे आहे. केंद्र शासनाच्या अनेक योजना मावळ लोकसभा मतदारसंघात राबविणार आहे.

यावेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, ज्येष्ठ नेते गणेश भेगडे आदींची भाषणे झाली. विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन खासदार श्रीरंग बारणे व राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे व राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. आनंद घोडके यांच्या नेतृत्वाखाली नाद सम्राट ढोल ताशा पथकाने वाद्यकाम करून खासदार व राज्यमंत्री यांचे स्वागत केले.

तळेगाव दाभाडे स्टेशन चौकातील तसेच शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी म्हणून जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत १० कोटी, ३१ लक्ष रुपयांच्या निधीतून हा रेल्वे भुयारी पूल तयार करण्यात आला आहे. रेल्वे भुयारी पुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा नागरिकांना होती. या रेल्वे भुयारी पुलामुळे वाहतूक कोंडीत गुदमरणारा श्वास मोकळा होणार असल्याने समधान व्यक्त होत आहे. यशवंतनगर येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत १० कोटी १० लक्ष रुपयांच्या निधीतून जैवविविधता उद्यानाचे भूमिपूजन होणार आहे. याद्वारे पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यात येणार आहे. नगरपरिषदेने एक महत्वाचे पाउल टाकल्याने कौतुक होत आहे.

वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत तळेगाव दाभाडे शहरांमध्ये मारुती मंदिर चौक व जिजामाता चौक या मोक्याच्या व वर्दळीच्या ठिकाणी व्यापारी संकुलाचे गाळे उभारण्यात आले असून मारुती मंदिर चौकाजवळ १० कोटी लक्ष रुपयांच्या निधीतून ७८ व्यापारी गाळे तर जिजामाता चौकात २ कोटी ५२ लक्ष रुपयांच्या निधीतून ४४ व्यापारी गाळे व्यापारी उभारण्यात आले आहेत. या व्यापारी संकुलामुळे शहरात उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे.

महाराष्‍ट्र राज्‍य सुवर्णजयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत शहरातील मलमिश्रीत पाण्याचा निचरा होण्यासाठी ७३ कोटी रुपयांचा निधी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नाने भुयारी गटार योजनेसाठी मंजूर झाले असून यामुळे शहरांतील भुयारी गटारांची व्यवस्था होणार आहे. यासाठी संपूर्ण शहरामध्ये भुयारी पाईपलाईन द्वारे ड्रेनेज पाणी जमा केले जाणार असून यावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी प्रक्रिया केली जाणार आहे. याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मलशुद्धीकरण केंद्र बांधली जाणार आहेत.या योजनेमुळे पाणी प्रदूषणावर नियंत्रण होणार असून पर्यावरण समतोल राखण्यास मदत होणार आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

शहरातील पाणीपुरवठ्याची योजना अद्ययावत करण्यासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत मंजूर झाले असून सदरील कामाला सुरुवात होत आहे. शहरातील सर्वदूर पाणीपुरवठा मुबलक, सुरळीत व नियमित होण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांनी केले. स्वागत गटनेते सुशील सैंदाणे यांनी केले.सुत्रसंचालन उपनगराध्य संग्राम काकडे आणि नगरसेवक अॅड. श्रीराम कुबेर यांनी केले. आभार नगरसेवक अरुण भेगडे पाटील यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.