Talegaon : ‘त्या’ पाच सेकंदात दोन मेसेज आले अन खुनाचा उलगडा झाला

एमपीसी न्यूज – तळेगाव-चाकण रोडने दुचाकीवरून जाणा-या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना 12 जुलै 2018 रोजी तोलानी कॉलेज जवळ इंदोरी येथे घडली. या खुनाची उकल बरेच दिवस झाली नाही. अखेर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेकडे हा तपास आला असता तांत्रिक कौशल्ये वापरून खुनाचा तपास करण्यात आला. खून झालेल्या तरुणाच्या मोबाईलवर आलेल्या दोन मेसेज वरून खुनाला उलगडा झाला आहे.

दीपक ऊर्फ गणेश एकनाथ जरग (वय 19, रा. काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोहंमद सलीम मोहंमद नजर खान ऊर्फ सोनवीरसिंह विश्‍वंभरसिंग छोकर (वय 34, रा. मेवाती मोहल्ला, बोहडापूर, किशनबाग, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.

मयत दीपक याने आयटीआयचे शिक्षण घेतले होते. तळेगाव येथे त्याला इलेक्ट्रिक फिटिंगचे काम आले होते. ते काम तो त्याच्या एका मित्रासोबत करणार होता. त्यानिमित्त दीपक त्याच्या मित्राला भेटण्यासाठी तळेगाव येथे जात होता. इंदोरी मधील तोलानी कॉलेज जवळ आला असता एका स्पीड ब्रेकरवरून गाडीला हादरा बसल्याने त्याचा मोबाईल रस्त्यावर पडला. त्यावेळी आरोपी खान बाजूच्या एका हॉटेलवर त्याच्या एका मित्रासोबत जेवण करत होता. दीपकचा मोबाईल पडल्याने दिसताच खानने मोबाईल घेतला. त्यावरून खान आणि त्याच्या मित्राची भांडणे सुरु झाली. त्यावेळी दीपक तेथे आला आणि मोबाईल त्याचा असल्याचे सांगितले. आरोपींनी त्याला रस्त्याच्या बाजूला नेले आणि खान याने दीपकच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दीपक याचे नातेवाईक, मित्र-मैत्रीण अशा वेगवेगळ्या अँगलने तपास केला. मात्र गुन्ह्याची उकल झाली नाही. 15 ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड आयुक्‍तालय झाल्यानंतर गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यास सुरवात केली. त्यावेळी दीपक याचा मोबाईल त्याचाजवळ नसल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता घटनेनंतर काही दिवसांनी पाच सेकंदाकरिता मोबाईल इतर सीम कार्डद्वारे सुरू होऊन त्यावर मोबाईल कंपनीचे दोन मेसेज आल्याचे दिसून आले आणि पोलिसांना तपासाला आणखी एक दिशा मिळाली.

पोलिसांनी मिळालेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती घेतली असता तो मोबाईल क्रमांक सतत प्रवासात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तांत्रिक गोष्टींचा आधार घेत संशयित ट्रकचालक याला मध्यप्रदेशातून अटक केली. त्याला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. दीपक याचा खून केल्यानंतर खान याने मोबाईल घेतला. मोबाईल रस्त्यावर पडल्याने त्यात बिघाड झाला होता. त्याला खान याने दुरुस्त करून घेतले. त्यात आपले सिमकार्ड टाकले. पण मोबाईल पाच सेकंदाकरिता सुरू झाला. त्यावर कंपनीचे एसएमएस आले आणि मोबाईल पुन्हा बंद पडला. याच एसएमएसमुळे पोलिसांच्या तपासाला दिशा मिळाली अन या खुनाचा उलगडा झाला आहे.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्‍त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहायक निरीक्षक गणेश पाटील, कर्मचारी अप्पा कारकूड, राजेश परंडवाल, हेमंत खरात, राजेंद्र शेटे आणि अमित गायकवाड यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.